नागपूर :  नागपूर महापालिकेचे वर्ष 2022 -23 या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी सादर केला आहे.  2 हजार 669 कोटींच्या खर्चाचे अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेची  पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यामुळे निवडणूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे महापालिकेत प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनीच आज हे अर्थसंकल्प सादर केले.


नागपूर महापालिकेला वर्ष 2022-23 या वर्षात उत्पन्नाच्या विविध स्रोतांमधून  2 हजार 657 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. तर विविध योजना आणि पायाभूत सोयीवर महापालिका 2 हजार 669 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.  या वर्षी नागपूरकरांवर कराचा कोणताही नवा बोजा लादण्यात आलेला नाही. दरम्यान, डिझेलचे वाढते दर लक्षात घेता महापालिकेच्या आपली बस सेवेचे भाडे येणाऱ्या काळात वाढविले जाऊ शकतात. महापालिकेच्या परिवहन समितीने त्यासंदर्भात प्रस्ताव दिले असून त्याबद्दल लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ही आयुक्तांनी दिली


आपली बस सेवेसाठी नव्या 40 इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले. कोरोनामुळे मागील दोन वर्षे विविध विकास कामे खोळंबले. मात्र, या वर्षी महापालिका केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरु असलेल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून पायाभूत सोयींवर प्राधान्याने खर्च केले जाईल असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी म्हणाले. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक 68 टक्के वाटा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा असणार आहे. मालमत्ता करातून 12 टक्के उत्पन्न मिळणार असून पाणीपट्टीतून 8 टक्के उत्पन्न मिळणार आहे. सुमारे तीन टक्के निधी महापालिका कर्जातून उभारणार आहे.


संबंधित बातम्या : 


KDMC Budget :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर



parliament session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता, महागाईच्या मुद्यावर चर्चा नाहीच