नागपूर : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या नागपुरातील विभागीय आणि उपविभागीय कार्यालयात काल (12 एप्रिल) संध्याकाळी सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. ईपीएफओ कार्यालयातील काही कर्मचारी खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचं काम करत आहे, अशी तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयच्या नागपुरातील पथकाने ईपीएफओ कार्यालय गाठले, आणि त्या ठिकाणी अनेक तास कागदपत्रांची तपासणी केली.
नागपूर सीबीआयचं लाचलुचपत प्रतिबंधक पथक आणि मुंबईतील ईपीएफओच्या दक्षता पथकाने नागपूरमधील तुकडोजी स्क्वेअरमधील कार्यालय आणि उमरेड रोडवरील कार्यालयात मंगळवारी सकाळपासून चौकशी केली. सीबीआय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तपासणीदरम्यान कोणत्याही ईपीएफओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. दोन्ही पथकांनी अनेक फाईल्स आणि पीएफ एन्ट्रीज तपासल्या.
ईपीएफओचे काही कर्मचारी जाणून-बुजून काही खाजगी कंपन्यांमध्ये जास्त कर्मचारी असतानाही त्या कंपन्यांच्या दाव्याप्रमाणे कमी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी जमा करुन घेत आहेत. खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच ईपीएफओचे कर्मचारी असे नियमबाह्य कार्य करत असल्याची तक्रार त्या खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर सीबीआयने ही चौकशी हाती घेतली आहे.
दरम्यान या चौकशीनंतर सीबीआयने काही कागदपत्रे सोबत नेले आहेत का, आणि याप्रकरणी ईपीएफओच्या काही कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल का हे अद्याप स्पष्ट नाही.
सीबीआयचं पथक आणि ईपीएफओचं दक्षता पथक येत्या काही दिवसात ईपीएफओच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. सीबीआयचे एसपी सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
EPFO : पीएफ खातेधारकांनी लवकरात लवकर करुन घ्या ई-नॉमिनेशन, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे
EPFO वर व्याजदर घटल्यानंतर कर्मचाऱ्यांना होणार 'इतकं' नुकसान; जाणून घ्या संपूर्ण गणित