Nagpur Railway Time Table : नागपूर मार्गे धावणारी कोल्हापूर - गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस उद्या, 26 आणि 27 जानेवारी हे दोन दिवस धावणार नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम तसेच कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वेगाडीला 26 आणि 27 जानेवारीला तर 28 आणि 29 जानेवारीला गोंदिया ते कोल्हापूरला दोन दिवस ब्रेक दिला जाणार आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसला रद्द करण्यासोबतच तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यानुसार 12130 हावडा - पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस 26 जानेवारीला आणि 22846 हटिया पुणे एक्स्प्रेस 27 जानेवारीला नागपूर, बल्लारपूर, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला पोहोचणार आहे. अशाच प्रकारे 12221 पुणे हावडा दुरंतो एक्स्प्रेस 28 जानेवारीला दौड, वाडी, सिकंदराबाद, काजीपेठ, बल्लारपूर नागपूर मार्गे हावडा स्टेशन गाठणार आहे. 28 जानेवारीला 12129 आझाद हिंद एक्स्प्रेस पुणे हावडा साईनगर शिर्डी येथून पाच तास उशिराने धावणार आहे. 22893 साईनगर शिर्डी हावडा एक्स्प्रेस 28 जानेवारीला 4 तास उशिराने धावणार.
'वंदे भारत'च्या वेळेत बदल करा, प्रवासी संघटनेची मागणी
बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. रायपूरहून नागपुरात (Nagpur Railway) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना परत जाण्यासाठी दुपारी 2 ऐवजी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांची वेळ झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. वंदे भारतच्या वेळेत बदल केल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळू शकतील. तेव्हा याकडे लक्ष देण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे.
'वंदे भारत'ला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न : खासदार सुनील मेंढे
नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्स्प्रेसला विदर्भात केवळ एकच थांबा देण्यात आला आहे. भंडारा आणि तुमसर येथेही या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी सातत्याने होते आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी तेव्हाच ही मागणी केली होती. यासंदर्भात नुकतीच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विलासपूर विभागीय बैठकीच्या नागपूर (Nagpur) येथील विभागीय रेल्वे कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा, (Bhandara) गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) हे या बैठकीचे सभापती होते. रेल्वेसंबंधी असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, आवश्यक तिथे मंत्री स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
ही बातमी देखील वाचा...