Nagpur Shivsena News :  मुख्यमंत्र्यांची शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेत कार्यकर्ते पळवण्याची स्पर्धा लागली असून, कोण कुठल्या गटाचा हेच समजेनासे झाले आहे. यातच शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही कार्यकारिणीत दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने चांगलाच गोंधळ वाढला आहे. शिंदे सेनेने काल जाहीर केलेल्या कार्यकारिणीत कामठीचे संघटक म्हणून विठ्ठल जुमडे यांची नियुक्ती केली. मात्र, जुमडे यांनी आपण उद्धव सेना सोडली नसल्याचे जाहीर करून नागपूर ग्रामीणचा तालुका प्रमुख असल्याचे सांगितले. दुसरीकडे शिंदे सेनेने उमरेड तालुका प्रमुख नेमलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा आपण उद्धव ठाकरेंच्या सेनेतच असल्याचे सांगून शिंदे सेनेत जाणार नसल्याचे पत्र दिले आहे.


आमदार, खासदारांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र, पण...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेतून बाहेर पडले आहेत. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. त्यांनी आपल्या समर्थकांनाही सोबत घेतले. जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यकारिणी जाहीर केली. विठ्ठल जुमडे यांच्याकडे कामठी विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून जबाबदारी सोपविली. शिंदे सेनेच्या कार्यकारिणीत आपले नाव बघून त्यांना धक्काच बसला. 


पत्रच केले जाहीर


आज त्यांनी प्रसिद्धपत्रक काढून आपण उद्धव ठाकरे यांची सेना सोडली नसल्याचे सांगितले. आपण पंधरा वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहोत. ग्रामीणचा तालुका प्रमुख म्हणून पक्षाने आपली नियुक्ती केली. आजही आपण याच पदावर कार्यरत आहोत. शिंदे सेनेच प्रवेश केला नसताना आपले नाव कार्यकारिणीत टाकण्यात आले. याबाबत आपल्याला विचारणासुद्धा केली नसल्याचे जुमडे आणि बावनकुळे यांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनाही त्यांनी याची लेखी माहिती दिली.


नव्या पदाचीही निर्मिती


उद्धव ठाकरे यांच्या सेनेने आपल्या सैनिकांना सोबत ठेवण्यासाठी नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. ती करताना कोणी नाराज किंवा उपरा राहणार नाही याची काळजी घेतली. अधिकाधिक कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी नव्या पदांची निर्मिती केली. रामटेकचे माजी खासदार तसेच माजी जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांना नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे सल्लागार करण्यात आले. हे पद यापूर्वी अस्तित्वात नव्हते. सल्लागाराला अधिकार कोणते आणि नेमके कुठले काम कारायचे याची कोणालाच माहिती नाही. पक्षातर्फे काहीच स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकाश जाधव पद स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसल्याची माहिती आहे.


ही बातमी देखील वाचा...


MPSC News : एमपीएससीच्या नियमामुळे पत्रकारितेच्या पदव्यांवरच प्रश्नचिन्ह ; पदवी आणि पदविका पात्र तर पदव्युत्तर पदवी अपात्र?