नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात (Nagpur Central Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty Shelke) आणि महायुतीकडून भाजप उमेदवार प्रवीण दटके (Pravin Datke) आणि रमेश पुणेकर (Ramesh Punekar) यांच्यात सामना रंगणार आहे. आता प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी मोठा दावा केला आहे.
"संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच", असा मोठा दावा मध्य नागपूरमधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रअंतर्गत गल्लीबोळात फिरून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात आहे. त्या ठिकाणी बंटी शेळके काँग्रेसचे उमेदवार असून यंदा भाजपच्या आणि संघाच्या गडात आम्ही आमचा (काँग्रेस) झेंडा रोवू असा बंटी शेळके यांचा दावा आहे. आता मध्य नागपूर मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा गड राहणार नाही, तर राहुल गांधी (Rahul Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गड बनवून दाखवू, असंही बंटी शेळके म्हणाले.
मध्य नागपूरची जनता 'तो' डाव हाणून पाडणार
नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रात मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीय आणि धार्मिक द्वेष पसरून समाजाला विभाजित केलं असलं, तरी मध्य नागपूरची जनता तो डाव यंदा हाणून पाडेल, असा विश्वासही बंटी शेळके यांनी व्यक्त केला आहे. मध्य नागपुरात शेळके यांचा लढा भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या विरोधात आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधात जोरदार टीका करणारे बंटी शेळके त्यांचे प्रतिस्पर्धी प्रवीण दटके यांच्याबद्दल बोलताना मात्र ते माझे मोठे बंधू असून आम्ही त्यांच्या विरोधात प्रेमाने (मोहब्बत की दुकान) निवडणूक लढवू, असे त्यांनी म्हटले आहे.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत
दरम्यान, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात हलबा जातीचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपकडून सातत्याने तर काँग्रेसकडून अधूनमधून हलबा उमेदवारांना संधी दिली जात होती. मात्र यंदा भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी हलबा जातीतील उमेदवारांना संधी न देता वेगळे राजकीय प्रयोग केले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय हलबा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. नुकताच हलबा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांची तसेच विविध सामाजिक संघटनांची बैठक होऊन हलबा जातीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय करण्यात आला होता. त्या अनुषंगाने रमेश पुणेकर यांना हलबा जातीचा एक उमेदवार म्हणून निवडण्यात आलं होतं. संपूर्ण जातीचा एकच उमेदवार असा निर्णय झाल्यानंतर हलबा जातीच्या मध्य नागपुरातील इतर सर्व उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेत यंदाच्या निवडणुकीमध्ये हलवा समाजामध्ये वेगळाच ऐक्य असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे मध्य नागपुरात रमेश पुणेकर, भाजपचे प्रवीण दटके व काँग्रेसचे बंटी शेळके अशी तिरंगी लढतीची स्थिती उद्भवली आहे.
आणखी वाचा