नागपूर : गेल्या काही महिन्यांमध्ये विमान कंपन्या आणि रेल्वेमध्ये स्फोट होणार असल्याची भीती असल्याचे अनेक ई-मेल पोलिसांना पाठवण्यात आले होते. आता पोलिसांनी हे ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विमान कंपन्या आणि रेल्वेत स्फोट घडेल अशी माहिती देणारे ईमेल पाठवणाऱ्या जगदीश उईकेने एक-दोन नव्हे, तर तब्बल 36 ईमेल पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी जगदीश उईकेला अटक केली असून त्याने ईमेल करण्यासाठी वापरलेले कॉम्प्युटर आणि इतर डिवाइस ही पोलिसांनी जप्त केले आहेत.


विमान अन् रेल्वेत स्फोट होणार असल्याचे ई-मेल


सध्या नागपूर पोलिसांचे सायबर सेल त्या सर्व डिवाइसचा ॲनालिसिस करत असून त्याच्यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती नागपूरची पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली. दरम्यान जगदीश उईके तपासात सहकार्य करत नसून वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.


'यासाठी' घातला सर्व घाट


जगदीश उईकेने काही वर्षांपूर्वी "आतंकवाद एक तुफानी राक्षस" नावाचा पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक प्रकाशित व्हावं, यासाठी त्याने हे ईमेल केल्याचे तो तपासात सांगत आहे. मात्र, पोलिसांचा त्याच्या या थेअरीवर विश्वास नसून नागपूर पोलिसांसह इतर एजन्सीस जगदीश उईकेचा सखोल तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.  


कोण आहे जगदीश उईके?


जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील रहिवासी आहे. मात्र, 2016 पासून तो गोंदिया सोडून गेलेला होता. त्याने गोंदियामधील त्याचे घरही विकले होते. तसेच तो आपल्या आई-वडिलांसोबतही राहत नव्हता. 2016 पासून तो कुठे होता, याबाबत स्पष्ट माहिती नाही. जगदीश उईकेने गेल्या काही दिवसात विमान कंपन्या, वेगवेगळे विमानतळ आणि रेल्वेला धमकीचे ईमेल पाठविले होते.  


ई-मेलमुळे विमान कंपन्यांचं कोट्यवधीचं नुकसान


धमकीचे ईमेल आल्यानंतर विविध विमानतळावर तपासणी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे अनेक विमानाच्या उड्डाणाला उशीर होऊन विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. नुकतेच तशाच आशयाचे ई-मेल रेल्वेमंत्री यांच्यासह रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये पाठविले होते. एक टेरर कोड डी कोड करण्यात आला असल्याचा दावा करत त्या ई-मेलमध्ये पुढील पाच दिवसात देशातील विविध रेल्वे स्टेशन आणि रेल्वे विभागाच्या परिसरामध्ये 30 पेक्षा जास्त स्फोट होतील असा आशय नमूद होता. 


पोलिस तपासात समोर आली माहिती


त्या संदर्भात जेव्हा सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास केलं. तेव्हा या ईमेल जगदीश उईके नावाचा तरुण करत असल्याचे समोर आले. तेव्हापासून गोंदिया पोलिस, नागपूर पोलिस यांच्यासह देशातील अनेक सुरक्षा एजन्सी जगदीश उईकेचा शोध घेत होते. विशेष म्हणजे जगदीश उईकेला 2021 मध्ये पोलिसांनी धमकीचे ई-मेल प्रकरणी अटक केली होती. त्यावेळच्या चौकशीत जगदीश उईके मानसिक अस्थिर असल्याची बाब तपास यंत्रणांच्या लक्षात आली होती. गेले काही दिवस जगदीश उईकेचे शेवटचे लोकेशन दिल्लीतील मिळाले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.