नागपूर: स्वर कोकीळा, सूर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं उपराजधानी नागपूर सोबत एक विशेष नातं होतं. नागपुरातील अनेक साहित्यिक आणि कलावंताच्या माध्यमातून त्या नागपूरशी जो होत्याच, मात्र नागपुरातील सीताबर्डी परिसरातील "महिंद्रकर अँड सन्स" या साडीच्या दुकानासोबतही दीदींचं आणि मंगेशकर कुटुंबियांचं वेगळं नातं होतं..


सन 1996 मध्ये जेव्हा नागपूर महानगरपालिकेने पूर्वीच्या काही कटू प्रसंगांमुळे नागपुरात अनेक वर्ष येणं टाळणार्‍या लतादीदींचा जाहीर नागरी सत्कार केला तेव्हा दीदींना खास पैठणी साडी नेसून सन्मानित करण्यात आलं. तेव्हा महापालिकेने महिंद्रकर अँड सन्स या खास दुकानातून ती खास पैठणी विणून घेतली होती. त्या पैठणीचा पदर दीदींना एवढा आवडला होता की महापालिकेने केलेल्या जाहीर सत्काराच्या दुसऱ्याच दिवशी लता दीदी या उषाताई आणि मीनाताईना सोबत घेऊन महिंद्रकर अँड सन्स या सीताबर्डी बाजारातील गल्लीत असलेल्या छोट्याश्या साडीच्या दुकानात पोहोचल्या. या दुकानात तब्बल तीन तास थांबून मंगेशकर भगिनींनी अनेक साड्या पसंत केल्या आणि खरेदी करून मुंबईला नेल्या. त्यानंतरही विशेष प्रसंगी मंगेशकर कुटुंबियांकडून महिंद्रकर अँड सन्स या साडीच्या दुकानात पैठणी आणि इतर पारंपरिक पद्धतीच्या साड्यांसाठी ऑर्डर्स यायच्या.


एकदा अशीच एक ऑर्डर महिंद्रकर अँड सन्सचे मालक आशुतोष महिंद्रकर त्यांच्या कुटुंबात एक दुःखद घटना घडल्यामुळे (आजोबांचे निधन झाल्यामुळे) वेळेत पूर्ण करू शकले नाहीत. त्याच दरम्यान आशाताई एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आल्या. तेव्हा आशाताईंनी आशुतोष महिंद्रकर यांना बोलावून घेत साड्यांची ऑर्डर का पूर्ण होऊ शकली नाही याची चौकशी केली. जेव्हा महिंद्रकर कुटुंबात एक दुःखद प्रसंग घडल्यामुळे साड्यांची ऑर्डर वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांनी तुमच्या कुटुंबात दुःखद प्रसंग येऊनही तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असे म्हणत नाराजी व्यक्त केली नाही. तर आशुतोष महिंद्रकर यांचं थेट लतादीदींशी फोनवर बोलणं करून देत कुटुंबात दुःखद प्रसंग असल्यामुळे ते साड्यांची ऑर्डर वेळेत देऊ शकले नाही असं सांगितलं. तेव्हा लतादीदींनी ही महिंद्रकर यांचे सांत्वन केले आणि कुटुंबातला दुःखद प्रसंग आम्हाला का सांगितलं नाही अशी नाराजीही व्यक्त केली होती.


एवढ्या जगद्विख्यात गायिका एका छोट्याश्या दुकानदाराची आणि त्याच्या कुटुंबात आलेल्या दुखद प्रसंगाची आस्थेने चौकशी करतात, त्याची अडचण समजून घेतात, याच्यातच लतादीदींचा आणि मंगेशकर कुटुंबियांचा मोठेपणा आपल्यासमोर येत असल्याची प्रतिक्रिया आशुतोष महिंद्रकर यांनी व्यक्त केली आहे.


महिंद्रकर अॅंड संन्स साड्याचे हे दुकान नागपुरात 1927 पासून आहे. मूळचे सांगलीकर असलेले महिंद्रकर साड्यांच्या व्यवसायासाठी नागपुरात स्थायिक झाले आहेत. या सत्काराच्या दिवशी दीदींना जी साडी देण्यात आली होती, त्याच साडीचा पदर पाहून त्यांनी पुढे अनेक साड्या खरेदी करण्यासाठी महिंद्रकर अँड सन्स या दुकानाला प्राधान्य दिलं.


महत्त्वाच्या बातम्या: