नागपूर : बुलडाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या अक्षम्य हलगर्जीचं उदाहरण समोर आलं आहे. मृत व्यक्तीचा व्हिसेराच ही महिला पोलिस ट्रेनमध्ये विसरुन आली. संशयास्पद मृत्यू प्रकरणात मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी पोलिस मृत व्यक्तीच्या शरीराचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात.

आयटीबीपीचे जवान दोन दिवसांपूर्वीच निवडणूक स्पेशल ट्रेनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा बॉक्स विसरले होते. ही घटना ताजी असतानाच आता बुलडाण्यातील शेगाव पोलिस स्टेशनची महिला पोलीस कर्मचारी मृत व्यक्तीचा व्हिसेरा रेल्वेत विसरल्याचं समोर आलं.

शेगाव पोलिसातील संबंधित महिला कर्मचारी शेगाववरुन बॉक्समध्ये व्हिसेरा घेऊन हापा-बिलासपूर ट्रेनने अमरावतीला फॉरेन्सिक प्रयोगशाळेत जात होती. ती स्वतः अमरावतीला उतरली, मात्र व्हिसेराचा बॉक्स ट्रेनमध्येच विसरली. अमरावती रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिला संशयास्पद मृत्यू प्रकरणातील महत्वाचा पुरावा आपण ट्रेनमध्येच विसरल्याचं तिला लक्षात आलं.

त्यानंतर तिने पुढील रेल्वे स्टेशन म्हणजेच नागपूरला त्याची सूचना दिली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नागपूर रेल्वे स्टेशनवर ट्रेन येताच व्हिसेराच्या बॉक्सचा शोध घेत तो ताब्यात घेतला. त्यामुळे एका मृत्यू प्रकरणाच्या महत्त्वाच्या पुराव्याला प्रयोगशाळेत पाठवता आलं.

व्हिसेरा म्हणजे काय?

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याच्या नोंदी तपासून त्या बरोबर आहेत का, याची खात्री करुन पोस्टमॉर्टम केले जाते. या पंचनाम्यात काही गडबड आहे, असा संशय आल्यास नातेवाईकांना तहसीलदार (मामलेदार) कडे तक्रार करुन पंचनामा परत करुन घेता येतो. ग्रामीण भागात पोस्टमॉर्टम दिवसाच (सूर्योदय ते सूर्यास्त) करतात, रात्री करणं बेकायदेशीर मानलं जातं. तसंच पोस्टमॉर्टमचा अहवाल डॉक्टरांकडून ताबडतोब पोलिसांकडे जाणे आवश्यक असते. एखादे वेळेस जठर, फुप्फुस, आतडे, इत्यादी भाग (व्हिसेरा) बाटलीत काढून प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी सीलबंद करुन पाठवले जातात.