नागपूर  : राज्यात राम राज्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात पोलिसांची निष्क्रियता आणि दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करणारा आरोपी दीड महिन्यांपासून फरार असून सतत फोनवर पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याची तक्रार पोलिसांकडे केल्यावर पोलिसांनी पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पुन्हा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे दहशतीत जगणाऱ्या एका कुटुंबावर त्यांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा धमकीचा फोन कुटुंबातील चिमुकल्यांनी चुकून ही उचलू नये म्हणून तो नंबर घराच्या भिंतीवर लिहिण्याची वेळ आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील ही दुर्देवी घटना आहे.

पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी आरोपी राजेश भलावी या कुटुंबाच्या घरी आला होता. तो पीडित कुटुंबाचा अत्यंत लांबच्या नात्यातला आहे. 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 35 वर्षांच्या राजेश भलावीने 17 वर्षीय मुलीला घरात एकटे पाहून तिला घराशेजारी असलेल्या कापसाच्या शेतात ओढत नेत तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तेव्हा पासून फरार झालेला आरोपी राजेश भलावी आजवर पोलिसांना सापडला नाही.

संतापजनक बाब म्हणजे गेल्या दीड महिन्यात आरोपी राजेशने त्याच्या मोबाईलवरून अनेक वेळा पीडित कुटुंबियांना फोन करून धमकावले आहे. तुम्ही माझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, तुमचा जीव घेऊन माझा बदला घेईन अशा आशयाचे फोन तो कधीही करतो. आरोपी राजेश भलावी फोनवर कुटुंबातील चिमुकल्यांना फोनवर धमकावतो. त्याचमुळे आता या कुटुंबाने चिमुकल्यांना या नंबरवरून आलेले फोन उचलायचेच नाहीत, असे  सांगत आरोपीचे नंबर घराच्या भिंतीवर लिहिले आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून आरोपी मोकाट असल्यामुळे आणि तो सातत्याने त्याच्या मोबाईलवरून पीडित कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे. पीडित कुटुंबियांनी सावनेर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना त्यांची व्यथा सांगत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी त्यांनाच मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आरोपी अद्याप अटक झालेला नाही हे खरे असल्याचे सांगितले. फरार आरोपी जर पीडित कुटुंबियांना धमकावत असेल तर आम्ही त्यांना सुरक्षा पुरवू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तपास सुरु आहे, लवकरच आरोपीला जेरबंद करू असा दावाही त्यांनी केला आहे.