नागपूर : युती आणि आघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांना फायदा होईल, असं वरकरणी वाटत आहे. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेल्या चारही पक्षांच्या विजय किंवा पराभवाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी समोर येतील.
भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले, तेव्हा त्यांचा मतदार एकच होता का? मतदार द्विधा मनस्थितीत होता का? हिंदू मतांचं खरंच विभाजन होतं का? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदारांचंही असंच काहीसं झालं का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
2014 विधानसभा निवडणूक
भाजप आणि शिवसेना
1. भाजप 123 जागांवर विजयी. त्यापैकी फक्त 32 जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
2. शिवसेना 63 जागांवर विजयी. त्यापैकी फक्त 22 जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर
म्हणजेच 288 मतदारसंघांपैकी फक्त 54 जागांवर भाजप-शिवसेनेत थेट लढत झाली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी
1. काँग्रेस 42 जागी विजयी, त्यातील फक्त 4 जागांवर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
2. राष्ट्रवादी 41 जागांवर विजयी, त्यातील फक्त 7 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर
म्हणजेच 288 मतदारसंघांपैकी फक्त 11 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीची थेट लढत झाली
भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यावरही एकमेकांचे शत्रू क्रमांक एक नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. भाजपची सर्वाधिक मतदारसंघांमध्ये थेट लढत झाली, ती काँग्रेसशी. तर शिवसेनेची थेट लढत होती राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी.
भाजप ज्या 123 जागांवर विजयी झाली, तिथे काँग्रेस सर्वात जास्त म्हणजे 45 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती, शिवसेना फक्त 32 जागांवर दुसऱ्या स्थानी होती. दुसरीकडे, शिवसेना ज्या 63 जागा जिंकली, तिथे 18 जागांवर राष्ट्रवादी क्रमांक दोनवर होती.
2009 च्या युतीत शिवसेनेने जिंकलेल्या 13 जागांवर 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला. पण 2009 च्या युतीत विजय झालेल्या भिवंडी ग्रामीण ही एकमेव जागा सेनेला 2014 मध्ये भाजपकडून हिरावता आली.
भाजपने युती का केली, याचं कारणही आकडेवारीत दडलं आहे. 2009 आणि 2014 ची मोदी लाट हे एक मोठं कारण होतंच.
213 मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेची एकत्रित मतं ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त
युती नसल्यामुळे भाजप-शिवसेनेचे 31 जागांवर नुकसान
भाजपच्या 16 जागा शिवसेनेच्या मतविभाजनामुळे पराभूत
शिवसेनेच्या 15 जागा भाजपच्या मतविभाजनामुळे पराभूत
मोदी लाट ओसरलेली दिसत आहे. काँग्रेसने राहुल गांधींसोबत प्रियांकांच्या रुपाने ट्रम्प कार्ड टाकलं आहे. त्यामुळे भाजपने ही युती राज्यासाठी नव्हे, तर केंद्रात सत्ता खेचून आणण्यासाठी केल्याचं दिसत आहे. आता ही आकडेमोड स्थानिक पातळीवर यशस्वी ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भाजपचा शत्रू काँग्रेस, शिवसेनेचा राष्ट्रवादी, निवडणुकांची इंटरेस्टिंग आकडेवारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2019 04:38 PM (IST)
भाजप ज्या 123 जागांवर विजयी झाली, तिथे काँग्रेस सर्वात जास्त म्हणजे 45 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती, शिवसेना फक्त 32 जागांवर दुसऱ्या स्थानी होती. दुसरीकडे, शिवसेना ज्या 63 जागा जिंकली, तिथे 18 जागांवर राष्ट्रवादी क्रमांक दोनवर होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -