नागपूर : लग्नाच्या वरातीत फक्त वधू-वर असून चालत नाही, तर बँड-बाजासह बारातीही लागतातच. राजकारणातही असंच असतं. पण युतीच्या वरातीत शिवसेना-भाजपला 'बाराती' म्हणजेच वऱ्हाडी मंडळी नको असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 2014 मधील निवडणुकांमध्ये सोबत असलेले मित्रपक्ष नक्की कुठे असणार, असा सवाल निर्माण झाला आहे.


2014 मध्ये शिवसेना भाजप स्वतंत्र लढत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांना 288 जागांवर उमेदवार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत मित्रपक्षांची चांदी झाली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, कारण दोन्ही निवडणुकांना सेना-भाजपची युती सामोरी जाणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मित्रपक्षांसाठी युतीमध्ये चार जागा होत्या. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत फार-फार तर एखाद्या मित्रपक्षाला म्हणजेच महादेव जानकरांच्या रासपला बारामतीमध्ये एक जागा मिळू शकते, असं म्हटलं जात आहे. येत्या विधानसभेत युतीतील सर्व मित्रपक्षांना फक्त आठ जागा सोडण्याची तयारी भाजप-शिवसेनेची आहे.

सध्या सर्वात वाईट स्थिती कोणाची झाली असेल, तर ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. एकीकडे राजू शेट्टींनी फडणवीस सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्याशी शत्रुत्व पत्करलं. तर तिथे महाआघाडीनेही घात केला. त्यामुळे आता नावाला साजेसा 'स्वाभिमान' जागवून मित्रांविनाची लढण्याची वेळ स्वाभिमानीवर आली आहे

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसभेत स्वतःला मुंबई दक्षिण मध्यची जागा मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे यांच्या भेटीगाठी घेण्याचा विचार केला आहे. तर सदाभाऊ खोत हे हातकणंगलेची जागा मागणार असल्याची चर्चा आहे. मात्र या जागेवरही शिवसेनेचा धैर्यशील मानेंसाठी डोळा आहे.

एकीकडे युतीच्या मित्रांची लोकसभेसाठी डाळ शिजत नसताना, विधानसभेतही त्यांच्या वाट्याला जेमतेमच जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या विधानसभेत वेगळं लढलेल्या शिवसेनेबरोबर कोणी मित्र नव्हता, तर भाजपने मात्र स्वाभिमानीला 11, रासपला 6, रिपाइंला 3 जागा सोडल्या होत्या. शिवसंग्राम मात्र भाजपच्या चिन्हावर लढले होते.

येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मित्रपक्षांची मागणी

1. रिपाइं - 18 (2014 मध्ये 5 जागांवर लढले)
2. रासप - 8 (2014 मध्ये 6 जागांवर लढले)
3. शिवसंग्राम - 2 (2014 मध्ये भाजपच्या चिन्हावर 5 जागांवर लढले)
4. स्वाभिमानी (सदाभाऊ खोत गट) - 2  (2014 मध्ये 11 जागांवर लढले)

एकूण मागणी - 30

भाजप-शिवसेनेची जागा देण्याची तयारी - 8

गेल्या वेळी तीन मित्रपक्षांना मंत्रिपद मिळालं, मात्र आपल्याला न मिळाल्याने शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे नाराज होते. आजच्या घडीला शिवसेना-भाजपसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे महादेव जानकर. धनगर मतांकडे बघता जानकरांना युतीत मानाचं स्थान मिळू शकतो. युतीच्या लग्नात कोणता बाराती पोट फुटेस्तोवर नाचणार, आणि कोणाला डोक्यावर हात मारुन घ्यावं लागणार, हे लवकरच समजेल.