नागपूर : नागपूर शहरातील भारतीय नगर परिसरात राहणाऱ्या म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात केली आहे. मागील 24 वर्षांपासून रस्ता बनत नसल्याने त्रस्त होऊन म्हाडा कॉलोनीच्या रहिवाशांनी हे पाऊल उचलले आहे. शिवाय शासनाचा निषेध म्हणून आपल्या घरावर काळे झेंडे आणि बॅनरही लावले आहेत.


मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल मात्र नागपूरमध्ये मनकापूर पोलीस स्टेशनमध्ये रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन शासकीय विभागांकडून एकमेकांवर ढकला-ढकलीच्या धोरणामुळे म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले 24 वर्ष रस्त्याविना आहेत. आता या सर्वानी शासनाविरोधात एल्गार पुकारत रस्ता चोरीची तक्रार दाखल केली आहे.

शहरातील भारतीय नगर परिसरात म्हाडाने 1995 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबाना साडे चारशे चौरस फुटाचे घर दिले होते. 1995 च्या नकाशावर मंजूर असलेला आणि मुख्य बाजारपेठेपासून म्हाडा कॉलोनीला जोडणारा 12 मीटर रुंदीचा रस्ता होईल, अशी अपेक्षा या नागरिकांना होती. प्रत्येक वेळेला मागणी केल्यास 15 दिवसात तुमचा रस्ता बांधून देतो, असे आश्वासन राजकारण्यांकडून मिळत होते, असं स्थानिकांनी सांगितलं.

मात्र, रस्ता झालाच नाही. हळू हळू या प्रस्तावित रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही संस्थांनी आणि काही स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रस्तावित रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करत भिंत बांधून म्हाडा कॉलनीच्या लोकांचा ये जा करण्याचा मार्गच बंदिस्त केला. त्यामुळे स्थानिकांनी या समस्येला कंटाळून रस्ता चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली. या अजब तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले.

सुरुवातीला पोलिसांनी अशी तक्रार घेता येत नाही असा सूर लगावला. मात्र रहिवाशांनी 1995 च्या मंजूर नकाशात असलेला रस्ता आज अस्तित्वातच नाही, या संदर्भातील योग्य कागदपत्रे पोलिसांना दाखवले. तेव्हा पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकार केली. शिवाय पोलिसांनी रहिवाशांची समस्या म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना पाठवून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.