नागपूर : नागपुरात लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी आणि गौ पालकांना गौ तस्करांनी मोठा धक्का द्यायला सुरुवात केली आहे. नागपूरच्या वेशीवरील वस्त्यांमधून मध्यरात्रीनंतर शेतकऱ्यांच्या अंगणातील गायी चोरण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरीच्या या घटनांमध्ये पोलिसांचीही उपस्थिती दिसून येत आहे. आता गौ तस्करांच्या गाडीच्या 50 सेकंद मागे पोलिसांची गाडी हा निव्वळ योगायोग आहे की त्यामागे आणखी काही प्रकार आहे, हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेली गौ तस्करांची गाडी नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. गड्डीगोदाम हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने गायी चोरणाऱ्या चोरट्यांमुळे कोरोनाचा नागपुरात इतरत्र फैलाव होण्याची भीतीही वाढली आहे.


गेल्या काही दिवसांपासून गाय चोरीच्या घटना वाढत आहेत. वाडी आणि जवळच्या लाव्हा या दोन गावातून तस्करांनी शनिवार आणि रविवारी रात्री 8 गायी चोरून नेल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांची अडचण एवढ्यावरच थांबत नाही. गौ तस्करांनी अंगणातून गोधन पळवल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास विलंब लावून अनेक वेळा पोलीस स्टेशनचे हेलपाटे घालायला लावले आहे.


शनिवारी पहाटे गाय चोरीला गेलेल्या लाव्हा गावाचे शेतकरी विठ्ठल आगरकर यांची तक्रार दोन दिवसानंतर नोंदवण्यात आली आहे. आधी गौ तस्करांनी देशोधडीला लावल्यानंतर पोलिसांचे असे वागणे योग्य आहे का? असा थेट सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. वाडी आणि लाव्हा दोन्ही ठिकाणी गौ तस्करांची कृती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतरही लगेच तक्रार घेऊन पोलिसांनी शोध का सुरु केला नाही? इतर शेतकऱ्यांच्या अंगणातील गायी चोरी होऊ का दिल्या? असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.



लाव्हा ग्रामपंचायतच्या सीसीटीव्हीमध्ये तसेच वाडी गावातील संजय ठाकरे या शेतकऱ्याच्या घराजवळच्या सीसीटीव्हीमध्ये गौ तस्करांचा एक मिनी ट्र्क दिसून आला आहे. पोलीस तपासाप्रमाणे तो नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरातला मिनी ट्रक असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे गड्डीगोदाम परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने तिथून ट्रक निघून चोऱ्या करून परत तिथेच जात असेल तर हे ज्या वाडी आणि लाव्हा परिसरात आजवर कोरोनाचा प्रवेश झालेला नाही, त्या परिसरात चोरांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच लॉकडाऊनमुळे शेतकरी, गौपालक सर्वांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यावर आता घराच्या अंगणातून दुधारू पशु चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.