मुंबई: दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झालंय. आज रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला आहे. आज विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं आहे. 


मी शिक्षण मंत्री असतो तर आज विद्यार्थ्यांवर ही वेळच आली नसती असं हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक एबीपी माझाशी बोलताना म्हणाला की, "मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं."


राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं कारण देऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, असं शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केलंय. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.


संबधित बातम्या: