मुंबई : दहावी-बारावीच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याला अटक करण्यात आली असून त्याला आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, त्याच्या अटकेनंतर आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये आज म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मेसेज व्हायरल होत असला तरी विकास फाटकच्या वकीलांनी सांगितले की, विकास फाटककडून असा कोणताही मेसेज देण्यात आलेला नाही.
सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाल्यानंतर विकास फाटक याचे वकिल अॅड. महेश मुळ्ये यांनी सांगितले की, "विकास फाटककडून असा कोणताही मेसेज व्हायरल करण्यात आला नाही. त्याने पुन्हा आंदोलन करण्याचे आवाहन केले नाही. काही समाजकंटक फाटकच्या नावाने असे मेसेज व्हायरल करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनासारखे कोणतेही पाऊल उचलू नये." अॅड. महेश मुळ्ये यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये असे आवाहन केले आहे.
"आपल्यासाठी हिंदुस्थानी भाऊ पुढे आला. त्यामुळे त्याला अटक झाली आहे, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. यासाठी आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबरोबरच आज त्याला सोडले नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात यावे," असा मेसेज व्हायरल होत आहे.
परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर काल त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे. विकास फाटक सध्या पोलीस कोठडीत आहे.
दरम्यान, व्हायरल मेसेजमुळे धारावी पोलीस अलर्ट झाले आहे. ठीक-ठिकाणी पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दल तैण्यात करण्यात आले आहे. धारावीच्या एन्ट्री पॉईंट वरही पोलीस तैनात आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेली स्थिती पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठी दक्षता घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Student Protest: रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मी का घेऊ? राज्य सरकार याला जबाबदार: हिंदुस्थानी भाऊ