नागपूर : राज्यावर बर्ड फ्लूचे वादळ घोंघावत असताना राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास विभाग 'पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या' ( वेटनरी डॉक्टर्स ) प्रचंड कमतरतेचा सामना करत आहे. त्यामुळे राज्यातील पशु पक्ष्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. वेटनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांप्रमाणे राज्यात किमान 6 हजार 600 पशु संवर्धन विकास अधिकारी आवश्यक आहेत. मात्र सध्या फक्त 1 हजार 765 अधिकारी राज्यात कार्यरत आहेत. पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या या प्रचंड कमतरतेची समस्या स्वतः सरकारनेच निर्माण केली असून त्यामुळेच बर्ड फ्लू सारख्या आपत्तीच्या काळात पशु संवर्धन विभाग पूर्ण शक्तीने शेतकऱ्यांच्या मदतीला उतरू शकत नसल्याचा आरोप पशु वैद्यकीय क्षेत्रातील स्नातक विद्यार्थ्यांनी केला आहे.


राज्यात 2018 च्या पशु गणनेप्रमाणे 3 कोटी 300 लाख पशु पक्ष्यांची नोंद आहे. वेटनरी काउन्सिल ऑफ इंडियाचे निकष आहेत की दर 5 हजार पशुपक्ष्यांमागे किमान एक पशु संवर्धन अधिकारी (पशु वैद्यक) असायला हवा. या निकषांप्रमाणे राज्यात किमान 6 हजार 600 पशु संवर्धन विकास अधिकारी आवश्यक आहेत. मात्र राज्याचा पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभाग अवघ्या 1 हजार 765 पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या भरवशावर 3 कोटी 30 लाख पशु पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.


डॉक्टरांच्या याच कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून त्यांचे पशुधन रोगांना बळी पडत असल्याचा आरोप पशु वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. विविध जातींच्या आरक्षणाच्या चिघळलेल्या मुद्द्यामुळे पशु संवर्धन विभागात भरती प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले आहे.


पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या 435 पदांसाठी 23 ऑगस्ट 2019 मध्ये जाहिरात येऊन आणि डिसेंबर 2019 मध्ये त्यासाठी लेखी परीक्षाही पार पडली. मात्र गेल्या 13 महिन्यांपासून आरक्षणाच्या गुंत्यामुळे परीक्षेचा निकाल लावला गेला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे. जनावरांच्या आरोग्यासाठी पशु संवर्धन विभागाचा कणा म्हणून काम करणाऱ्या पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांचे पद भरण्याकडे अनास्था असलेलं शासन बर्ड फ्लूसोबत कसं लढणार असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.