नागपूर : येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात 'जेल पर्यटन' सुरु करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करतील. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.


"शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे." असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.


कारागृहाचा इतिहास कळणार


भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसेच इतर कारागृहांतही जसे की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करुन ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. 1899 मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांना सुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिध्द अतिरेकी अजमल कसाबला सुध्दा याच कारागृहात फाशी देण्यात आली.

शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच 'जेल पर्यटन' सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे.

पुरेशी खबरदारी घेणार!
हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मुलभुत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल. अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर अर्ज करावा लागेल. पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींनी पुढील नमुद केलेले जसे की,आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तु कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसेच व्हीडीओग्राफीची व्यवस्था केलेली असुन ते कारागृहातुन बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. तथापि, कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल. तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ : 26 जानेवारीपासून पुण्यातील येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन' सुरु करणार : अनिल देशमुख