Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण सुरू आहे. अशातच आता याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील जाती-पातीच्या राजकारणानं जोर धरल्याचं बोललं जात आहे. याचसंदर्भात सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय. समाजातील सर्व समस्या गरिबी, भूकबळी, बेरोजगारी ह्या सर्व जातीमुळे आहे, गॅस सिलेंडर सारख्याच दराने हिंदू आणि मुस्लिमाला मिळतो, तरी राजकारण करणारे राजकारण करत असतात, असं नितीन गडकरी म्हणाले. तसेच, आम्ही मात्र जात-पात अस्पृश्यता मानणार नाही, या शब्दात राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेटच सुनावलं आहे.
नागपुरात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या निदान केंद्राच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावरुन केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
मी जातपात मानीत नाही आणि जातीपातीच्या चर्चेत सहभागीही होत नाही : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, "मी जातपात मानीत नाही आणि जातीपातीच्या चर्चेत सहभागीही होत नाही. माणूस त्याच्या जातीने नाही, तर गुणांनी मोठा होतो. समाजातील गरिबी, बेरोजगारी आणि उपासमारी ही सर्वच जातींची समस्या आहे. गॅसचे सिलिंडर हिंदू आणि मुसलमानाला एकाच भावात मिळते. बाकी राजकारण करणारे करत राहो. त्यात आक्षेप असण्याचं काही कारण नाही. तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही जातपात आणि अस्पृश्यता मानणार नाही." तसेच, आमचे दरवाजे विरोधकांसाठीही खुले आहेत. त्यांचीही आम्ही सेवा करू जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊ. सर्व लोक मला आशीर्वाद देतात. साधारणत: नेते पैसे घेण्याचं काम करतात, पण मी देण्याचं काम करतो, असा टोलाही यावेळी बोलताना नितीन गडकरींनी लगावला.
साधारणपणे नेते पैसे घेण्याचं काम करतात, मात्र मी पैसे देण्याचं काम करतो. कोविड काळामध्ये शंभर कोटी रुपयांची चॅरीटीची कामं मी केली, असं नितीन गडकरी म्हणाले. जातपात मी मानत नाही आणि त्या संदर्भात जेवढ्या चर्चा होतात, त्यामध्ये मी सहभागी ही होत नाही. कारण माणूस जातीनं नाही तर गुणांनी मोठा होतो. आम्ही समाजाची मानवतेच्या आधारावर सेवा करत राहणार, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. तसेच, कोणत्याही पक्षाचा माणूस असो. कुठल्याही जात, धर्म, पंथाचा माणूस असो. एवढंच काय तर आमच्या राजकीय विरोधकांसाठीही आमची दारं उघडी आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.