नागपूर : उपमुख्यमंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून (Nagpur Flood) त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. दागा लेआऊटमध्ये देखील फडणवीसांनी नुकसानाचा आढावा घेतला. पूरग्रस्त इमारतींमध्ये पाहणी करताना काही रहिवाशांनी प्रशासनाबाबत नाराजी देखील व्यक्त केली. नाग नदी परिसरात ढगफूटीसदृश पाऊस झाल्यानं नागपुरात पूरस्थिती निर्माण झाले. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाल्याने शहरांत पाणी शिरले आतापर्यंत तीघांचा मृत्यू तर 10 हजारांहून अधिक घरं आणि दुकानांचं नुकसान झाले आहे.
पूरस्थितीमागच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक कारण समोर आलंय, आणि ते म्हणजे शासकीय यंत्रणांच्या विविध विकासकामांमुळे नाद नदीच्या प्रवाहाला जागोजागी अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नदीनं आपला प्रवाह बदलल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सीताबर्डी, धांतोली मार्केटमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं.
नागपूर शहरात 10 हजार घराचं नुकसान
फडणवीस म्हणाले, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात झालेला आहे. नागरिकांना जास्तीत जास्त मदत त्यांना केली जाईल. नागपुरात झालेला पाऊस हा नेहमीपेक्षा अधिक पट जास्त होता. प्रत्येक आपत्ती काहीतरी शिकवून जातो त्यामुळे आता तशी व्यवस्था केली जाईल. नागपूर शहरात 10 हजार घराचं नुकसान झालं आहे. त्यांना योग्य ती मदत केली जाईल. काल झालेला पाऊस अधिक प्रमाणात होता त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली
नागपुरात कुठे किती पाऊस?
नागपूर विमानतळ परिसरामध्ये 111 मिमी पावसाची नोंद झाली, तर सीतीबर्डी परिसरामध्ये देखील 111 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पार्डी भागामध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच वाडी परिसरामध्ये सर्वाधिक 229 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्रीपासून नागपुरात सुरु असलेल्या पावसाने शनिवार सकाळपासून थोडी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतय. पावसाने जरी उसंत घेतली असली तरीही नागपूरच्या सीताबर्डी , धंतोली मार्केट मधील काही दुकानांमधील पाणी अजूनही ओसरलं नाही. अजूनही अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुकानं, हॉटेलमध्ये पाणी भरलं आहे. नागपूर महानगर पालिकेचे पथक युद्ध पातळीवर पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेक दुकानातील पाणी ओसरलं नाही.