नागपूर : नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्या दोघांनाही अटक केली आहे.
सीताबर्डी परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या फ्रेंड्स गारमेंट्स नावाच्या कपड्यांच्या दुकानातील चेंजिंग रुममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 17 वर्षांची महाविद्यालयीन तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी फ्रेंड्स गारमेंट्स या दुकानात गेली होती. आवडलेले कपडे घालून पाहण्यासाठी ती दुकानातील चेंजिंग रुममध्ये गेली. तिथे ती कपडे बदलत असताना तिला चेंजिंग रुममध्ये एका कोपऱ्यात मोबाईल लपवलेला दिसला.
त्या तरुणीने तो मोबाईल काढून पहिला. तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण त्यात तिचेच कपडे बदलतानाचे चित्रिकरण दिसून आले. त्यानंतर तिने हिंमत करुन दुकानदाराला जाब विचारला. मात्र, दुकानमालकाने व तिथल्या नोकराने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली.
पोलीस तपासात फ्रेंड्स गारमेंट्स या कपड्यांच्या दुकानात काम करणारा निखिल उर्फ पिंटू दीपक चौथमल या सेल्समनने हा छुपा कॅमेरा चेंजिंग रूममध्ये लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. तो गेले अनेक दिवस अशाच पद्धतीने मोबाईलद्वारे चेंजिंग रूममध्ये येणाऱ्या तरुणींचे, महिलांचे चित्रिकरण करत होता.
पोलिसांनी याप्रकरणी निखिल चौथमल आणि दुकानाचा मालक किसन अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आरोपी नोकराला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली असून दुकानमालकाची जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान आरोपींनी याप्रकारे आणखी किती तरुणींचे आणि महिलांचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण केले आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
नागपुरातील कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा, मालकासह दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2019 11:20 AM (IST)
नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -