नागपूर : कर्नाटकच्या आलमट्टी धरणात अडवले जाते. या धरणात पाणी अडवल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. शासनाने पूरग्रस्त लोकांना कुठलीही मदत दिली नाही, एकीकडे पूर परिस्थिती निर्माण होत असताना भाजप आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी यात्रेत सहभागी होते, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


पूरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी म्हणून खावटी देण्यात येते ती अजूनही लोकांना देण्यात आली नाही. आमदार, मंत्री पूरग्रस्त भागात भेटी देत असल्याने प्रशासन त्यांच्यामागे फिरत आहे. परंतु पूरग्रस्तांना मदत मिळत नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री पर्यटन करायला जातात. ते पूर परिस्थिती बद्दल गंभीर नाहीत असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरात अडकले असताना सरकारकडे निवडणूक प्रचाराच्या कामासाठी पैसे आहेत मात्र दुष्काळग्रस्त भागाला मदतीसाठी निधी का नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

महापुराचं थैमान कायम
दरम्यान, सलग सहाव्या दिवशीही कोल्हापुरात महापुरानं घातलेलं थैमान कायम आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र ओसरलेलं नाही. त्यामुळं कोल्हापूर, सांगली आणि कराडमधल्या नागरिकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान सहाव्या दिवशीही हवाई दल, एनडीआरएफ यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. सांगलीमध्ये एनडीआरएफला लष्कराची मदत मिळाल्यानं रेस्क्यू ऑपरेशनला वेग आल्याचं बघायला मिळतंय. महापुराच अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून फूड पॅकेट्स दिले जातायत. यासाठी लष्कराच्या 2 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. सांगलीतही कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे.