G N Saibaba : नक्षलवाद (Naxal) प्रकरणी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मोठा दिलासा दिला आहे. जी.एन. साईबाबा यांची जन्मठेप रद्द करण्यात आली आहे. प्राध्यापक जी.एन. साईबाबा (G N Saibaba) यांनी नक्षलवाद्यांशी (Naxalite) संबंध ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याचा आरोप असलेल्या आणि गडचिरोली सत्र न्यायालयाकडून झालेली जन्मठेपेची शिक्षा नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. जीएन साईबाबांसह पाच आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष सुटका झाली आहे.
जीएन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष सुटका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डीयूचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर चार जणांना माओवादी संबंध प्रकरणात दोषी ठरवत 2017 च्या सत्र न्यायालयाच्या आदेशात बदल केला आहे. या प्रकरणी जन्मठेपच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपूर खंडपीठाकडून जी एन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि तत्कालीन सरकारसह सर्वांनाच हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार?
सरकारी पक्ष या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात सरकारी पक्षाचे वकील शक्यता तपासून पाहत आहे. जी एन साई बाबा सध्या नागपूर सेंट्रल जेलमध्ये आहे. जी एन साई बाबा आणि इतर पाच आरोपी यांना न्यायालयाने निर्दोष मानलं आहे. या आरोपींना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका आहे.
अपुऱ्या पुराव्यांमुळे निर्दोष सुटका
UAPA लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच, साई बाबा आणि इतर आरोपींच्या संबंधित ठिकाणावरुन पुरावे खासकरून डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी एन साई बाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाही. या आधारावर जी एन साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे.
नागपूर खंडपीठाकडून दिलासा
जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी नक्षलवादी कारवाईच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात जी.एन. साईबाबा आणि इतर सहकाऱ्यांनी नागपूर खंडपीठात अपील दाखल करत सत्र न्यायालयाचे निर्णयाला आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठात 7 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. नागपूर खंडपीठ आज या संदर्भात मोठा निकाल दिला आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना वर्ष 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबांचा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबांच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे मिळून आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर साईबाबाला पोलिसांनी अटक केली होती.
नक्षली कारवायांना मदत केल्याचा आरोप
दरम्यान, साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप ठेवला होता. एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी पाचनुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी म्हटलं होतं. त्यामुळे साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.