नागपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्व प्रकारची परवानगी देण्याकरिता नागपूर महानगरपालिकातर्फे एक खिडकीची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे. यंदा साजरा होणारा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असला तरी नागरिकांनी जबाबदारीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे रघुजी राजे भोसले नगर भवन (टाउन हॉल) महाल येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस उपायुक्त वसवराज तेली, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा) डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हरीश राऊत, अशोक पाटील, गणेश राठोड, ग्रीन व्हिजिल फॉऊंडेशन कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छ असोसिएशनच्या अनुसया काळे छाबरानी आदी उपस्थित होते.
फुटाळ्यात 4 फुटांवर मूर्ती विसर्जनावर बंदी
मनपा आयुक्तांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे निर्देशानुसार यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, सध्या नागपुरात गांधीसागर तलाव आणि सोनेगाव तलावात सौदर्यींकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. तसेच फुटाळा तलावात मोठे फॉऊंटन लावले असल्याने, यंदा 4 फुटाच्या वर उंची असलेले गणेश मूर्ती चे विसर्जन या तलावात करता येणार नाही. फुटाळा तलावात चार फुटाच्यावर गणेश मूर्ती विसर्सजनाची परवानगी कुठल्याही मंडळाला मिळणार नाही. त्यांनी सांगितले की, नागपूर मध्ये मागच्या काही वर्षांपासून तलावात विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. याचा चांगला परिणाम दिसायला मिळत आहे.
एक खिडकी व्यवस्था
नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, सर्व परवानगी देण्यासाठी एक खिडकी ची व्यवस्था करण्यात येणार असून तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकार सुद्धा दिले जातील. तसेच मोकाट जनावरापासून होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी मोकाट जनावरे कोंडवाड्यात पाठविण्यात येतील आणि संबधित जनावरांच्या मालकांवर मोठा दंड आकारण्यात येईल. त्यांनी सांगितले की, कृत्रिम विसर्जन टॅंकची संख्या यंदा दुप्पट करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. तसेच 4 फूटापेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन नागपूरच्या बाहेर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्या ठिकाणी मनपातर्फे क्रेन आणि विद्युत रोषणाई ची व्यवस्था करण्यात येईल. तसेच निर्माल्य संकलनासाठी मोठे कलश लावण्यात येतील आणि सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. मनपा तर्फे पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येईल. बैठकीत पोलीस उपायुक्त वसवराज तेली यांनी सांगितले की, वाहतुकीची परवानगी लवकरात लवकर देण्याचे निर्देश देण्यात येतील तसेच गणेशोत्सव दरम्यान तीन दिवस डीजे उशिरा रात्री पर्यंत वाजविण्याची परवानगी देण्यात येईल तरी पण सर्वोच्च न्यायालय आणि शासनाचे निर्देशाचे पालन करावे लागेल.
Chandrashekhar Bawankule : पक्षाने तिकीट नकारलेले बावनकुळे आता 2024 मध्ये तिकीट वाटणार
मंडपाचे परवानगीशुल्क पूर्ण माफ
बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवाकरिता सुधारित मार्गदर्शीका जारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे 200 रुपये शुल्क पुर्णपणे माफ करण्यात आले आहे. मूर्तीकारांच्या मंडपाकरीताचे शुल्क प्रमुख अग्नीशमन अधिकारी यांच्याकडून पुर्णपणे माफ करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या मंडप उभारणीबाबत उद्यान विभाग, मालमत्ता विभाग व खाजगी भुखंडावर आकारण्यात येणारे शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी 4 फुट उंचीची मर्यादा घालण्यात आली होती. ती मर्यादा हटविण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. घरगुती गणेश मूर्तीसाठी याअगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती. तरी, आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. गणेश मंडळांनी परवानगीचे अर्जासोबतच किती फुटाचा गणपती राहणार आहे व तो कुठे विसर्जन करणार आहे हे पण नमूद करावे, जेणेकरुन त्याप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त तयारी करणे सोयीचे होईल. यावेळी कौस्तुभ चॅटर्जी, अनुसूया काळे छाबरानी यांनी सुद्धा आपले मत मांडले आणि नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवेदन केले. गणेश मंडळाचे प्रतिनिधी विकास, संजय भिलकर, अरविंद रतुडी आणि इतरांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.