Chandrashekhar Bawankule : 2019च्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने राज्याचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नकारले होते. मात्र तरी पक्षासोबत एकनिष्ठ राहत सतत पक्षाला उर्जा प्रदान करणारे बावनकुळे आता आगामी 2024च्या निवडणूकीत तिकीट वाटप करणार आहे. त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तर मुंबई महानगर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांना नियुक्त करण्यात आले आहे. 


आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे ऊर्जामंत्री असताना त्यांनी त्या खात्याला ऊर्जा प्रदान केली. त्यांच्याच काळात लोडशेडींगमुक्त महाराष्ट्र जनतेने बघितला. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. दोन्ही खात्यांचे काम त्यांनी उत्तम रितीने केले. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार की नाही होणार, याबाबत राजकीय जाणकारही बुचकळ्यात पडलेले होते. पण त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पक्ष देणार, हे मात्र निश्‍चित मानले जात होते आणि आज त्यांच्या नियुक्तीचे पत्र येऊन धडकले आहे. 


निष्ठावान कार्यकर्ता


मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या पूर्वी मंत्रिपदाबाबत एबीपी माझाने त्यांना विचारले असता, 'मी आजपर्यंत कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. पक्षाने वेळोवेळी जी जबाबदारी दिली, ती निष्ठेने पार पाडली. पक्षाला वाटत असेल तर मी मंत्री होईल. नाहीतर पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडणे, येवढेच माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचे काम आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. 2019 मध्ये तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे आता 2024 मध्ये तिकीट वाटणारे होणार आहेत.



16 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी पार पाडली


2019 मध्ये पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांना अचानक ऐन वेळेवर विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. याबाबत विचारले असता, 'मला जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर तीन वेळा आमदार, नंतर कॅबिनेट मंत्री आणि तेसुद्धा ऊर्जा आणि अबकारी सारखे महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आणि एक वेळा तिकीट नाकारली म्हणून पक्षावर नाराज असण्याचे कुठलेही कारण नाही. पक्षाला नसेल वाटले की मला तिकीट द्यावे. त्यांना दुसरी कुठली महत्वाची जबाबदारी द्यायची असेल.' असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांना 16 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी पक्षाने दिली होती. 


योगींसोबत पिंजून काढला उत्तर प्रदेश 


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराची धुरा पक्षाने बावनकुळेंवर सोपविली होती. त्याही वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचा कोपरा न कोपरा पिंजून काढला होता आणि त्याचा निकाल आज जगासमोर आहे. पक्षाशी, आपल्या नेत्यांशी एकनिष्ठ असलेले तळागाळातले नेतृत्व म्हणून आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाहिले जाते. 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने त्यांनी विधान परिषदेवर संधी दिली. विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही, असे कदाचित पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांनी ठरविले असावे. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नसावा. त्यामुळे बावनकुळे यांना आज प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे आता 2024 मध्ये तिकीट वाटणारे होणार आहेत.