Nagpur News Update : बँकेतून रोकड काढून दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची पाच लाख रूपयांची लूट केल्याची घटना नागपुरात घडली आहे. लूट झालेले वृद्ध शिवप्रसाद विश्वकर्मा हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शिवप्रसाद आणि त्यांच्या पत्नी मीना विश्वकर्मा यांनी आज दुपारी नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून पाच लाख रुपयांची रोकड काढली. ही रोकड पिशवीत भरून ते दुचाकीकडे जात असतानाच पार्किंग जवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. शिवप्रसाद यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.
शिवप्रसाद विश्वकर्मा हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक आहेत. घराच्या बांधकामासाठी ते पत्नीसोबत स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून पाच लाख रुपये काढल्यानंतर ते पिशवीत ठेवून पत्नीच्या हातात दिले. यावेळी बँकेच्या बाहेर स्कुटर सुरू करत असताना मागून दुचाकीवरून दोन लुटारूंनी मीना यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून पळ काढला.
दरम्यान, आरोपी हे बँकेमधूनच वृद्ध दाम्पत्याच्या मागावर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या चोरट्यांना लवकरात-लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या वृद्ध दाम्पत्याने पोलिसांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jhund : 'झुंड'चे खरे हिरो नागपूरचे विजय बारसे; 'स्लम सॉकर' काय आहे? ज्यावर बनलाय सिनेमा...
- Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाची झळ विदर्भातील व्यापार उद्योगांना; कोट्यवधी रुपये अडकले
Ukraine Russia War : Apple चा मोठा निर्णय, रशियात उत्पादनांची विक्री रोखली
- Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?