नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला पाचपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. दिवसागणिक हे युद्ध अधिकच भयानक रुप घेत आहे. या दरम्यान रशियाकडून सातत्याने हल्ले होत आहेत तर युक्रेननेही माघार घेण्याचं ठरवलं आहे. हे युद्ध घातक असल्याचं आणखी एक कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा हल्ला होत आहे.


जाणकारांच्या मते जर आणखी काही दिवस युद्ध सुरु राहिलं तर ते तिसऱ्या महायुद्धाचं स्वरुप घेईल. यामुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाने जगाला पुन्हा एकदा दोन गटांमध्ये विभागलं आहे. युक्रेनवर हल्ला केल्याने नाराज झालेले अनेक देश सातत्याने रशियावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. परंतु या प्रतिबंधांचा रशिया आणि युक्रेन युद्धावर किती परिणाम होतो हे पाहावं लागेल. याशिवाय युद्धानंतर बंदी घालणाऱ्या देशांसह रशिया कशाप्रकारचे संबंध ठेवेल, हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. 


जगातील अनेक देशांसाठी रशिया महत्त्वाचा देश आहे. केवळ तेल आणि वायू क्षेत्रातच या देशाचं महत्त्व नाही तर अनेक कमोडिटिस आणि मिनरल्सच्या बाबतीतही हा मोठा खेळाडू आहे. अशातच बंदी घातलेल्या देशांमध्ये या वस्तूंचा पुरवठा कमी होईल आणि दर गगनाला भिडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे कोरोना महामारीने बहुतांश देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत हे युद्ध जगभरात महागाईचा दर आतापर्यंतचा उच्चांक गाठेल.


कोणकोणत्या देशांची रशिया आणि युक्रेनला साथ?
या युद्धाने 40 वर्षांनंतर जगाला पुन्हा एकदा दोन गटांमध्ये विभागलं आहे. रशियाबाबत बोलायचं झाल्यास क्युबा हा त्यांच्या समर्थनार्थ समोर आलेला पहिला देश आहे. क्युबामध्ये युद्धादरम्यान सीमालगतच्या क्षेत्रांमध्ये नाटोच्या विस्तारावरुन अमेरिकेवर टीका केली होती. दोन्ही देशांनी जागतिक शांततेसाठी कूटनीतीने या मुद्द्यावर तोडगा काढावा असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे चीन देखील रशियाचं समर्थन करत आहे. चीनने आधीच सांगितलं होतं की, नाटो यूक्रेनमध्ये मनमानी करत आहे.


या देशांसह सोव्हिएत संघाचा भाग असलेले अर्मेनिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान आणि बेलारुसही रशियाची साथ देऊ शकतात. या देशांनी रशियाच्या पाठिशी राहण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या सहा देशांनी सामूहिक सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याचा अर्थ असा की, जर रशियावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर हे देश रशियाच्या मदतीसाठी पुढे येतील. तसंच रशियावरील हल्ला हा आपल्यावरील असल्याचं समजतील.


इराणही रशियाचं समर्थन करणार
आखाती देशांपैकी इराण हा रशियाची साथ देऊ शकतो. खरंतर रशिया सातत्याने इराणला आपल्या बाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आण्विक करार अयशस्वी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये काहीसा दुरावा आला होता. तर पाकिस्तानही रशियाचं समर्थक करु शकतो कारण पाकिस्तानचे पंतप्रधान अजूनही रशियाच्या दौऱ्यावर आहेत. 


हे देश युक्रेनचं समर्थन करु शकतात 
सध्याची परिस्थिती पाहत नाटोमध्ये सामील युरोपियन देश बेल्जियम, कॅनाडा, डेन्मार्क, फ्रान्स, आईसलॅण्ड, इटली, लग्जमबर्ग, नीदरलॅण्ड, नॉर्वे, पोर्तुगाल, ब्रिटेन आणि अमेरिका पूर्णत: युक्रेनचं समर्थन करतील. जर्मनीही युक्रेनची साथ देऊ शकते. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया ही युक्रेनचं समर्थन करत आहेत. त्याने रशियावर बंदी घालण्याची घोषणाही केली आहे.


भारताची भूमिका 
दरम्यान या युद्धात तटस्थ भूमिका घेणारा भारत एकमेव देश आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत. भारताच्या जीडीपीचा 40 टक्के भाग फॉरेन ट्रेडमधून येतो. भारताचा बहुतांश व्यवहार अमेरिका आणि त्यांचे सहयोगी पाश्चिमात्य देश आणि आखाती देशांसोबत होतो. भारत पाश्चिमात्या देशांसोबत एका वर्षात सुमारे 350 ते 400 बिलियन डॉलरचा व्यवहार करतो. तर रशिया आणि भारतामध्ये 10 से 12 बिलियन डॉलरचा व्यवहार होतो.