नागपूर : आजवर तुम्ही जंगल सफारी (Jungle Safari) जीप्सीमधून किंवा काही अगदी हत्तीवर बसून देखील केली असेल. पण जंगल सफारीचा नवा अनुभव तुम्हाला आता नागपुरातून घेता येणार आहे. नागपुरातील (Nagpur) पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बोटीमधून जंगल सफारी करता येणार आहे. बोटीमधून जंगल सफारीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असेल. 'बोट जंगल सफारी'च्या माध्यमातून वन्यप्रेमी आणि पर्यटकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन होईल. यामध्ये  वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे आणि इतर काही प्राणी पाहता येतील. 


या पाण्यातील मासे आणि मगरींचा थरारक अनुभव पर्यटकांना आता घेईल. तर नदीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या हजारो पक्ष्यांचे निरीक्षणही आता करता येणार आहे. राज्यातील आणि देशातील ही पहिलीच जंगल सफारी असणार आहे. यामध्ये पर्यटकांना एकून  23 किलोमीटरचा प्रवास करता येईल. यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, पेंच व्याघ्र प्रकल्पातील ज्या भागातून या जंगल सफारीची सुरुवात होणार आहे, त्या भागामध्ये जवळपास वीस वाघांचे वास्तव्य आहे. 


त्यामुळे वाघ प्रेमींसाठी ही बोट जंगल सफारी वेगळीच पर्वणी ठरणार आहे. या बोट जंगल सफारीसाठी वन विभागाने सध्या चाचपणी करण्यास सुरुवात केलीये. तसेच वन विभागाकडून यासंदर्भातील आढावा देखील घेण्यात येत आहे. तर आता लवकरच पर्यटकांना या जंगल सफारीचा आनंद घेता येईल. 


कशी असणार ही जंगल सफारी?


पेंच व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिली बोट जंगल सफारी नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल. या बोट जंगल सफारीमुळे जंगलाची शांतता भंग होणार नाही. कोणत्याही प्रकारचे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण न होऊ देण्यासाठी खास "सोलर बोट" वापरली जाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम विभागात चोरबाहुली ते नागलवाडी रेंज दरम्यान बोटीतून ही जंगल सफारी करता येईल. अडीच तासात जवळपास 23 किमीपर्यंत या बोटीतून जंगलाची सफर करता येणार आहे. तर या जंगलसफारीचे तिकीट दर हे प्रत्येकी 1500 रुपये इतके असणार आहेत. ज्या भागातून ही बोट जंगल सफारी होईल, त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या जंगलात सुमारे वीस वाघ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात बोटीतील पर्यटकांना त्यांचे हमखास दर्शन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


Haldiram : स्नॅक मार्केटमध्ये किंग असलेल्या 'हल्दीराम'ची सुरूवात कशी झाली? चार अगरवाल बंधूंचा वर्षाचा टर्नओव्हर किती?