मुंबई: टाटा आणि हल्दीरामच्या डीलची (Tata Haldiram Deal) चर्चा सुरू असल्याची बातमी समोर आली आणि उद्योग विश्वात एकच चर्चा सुरू झाली. टाटा कंझ्युमर्स कडून भारतीय स्नॅक मार्केटमध्ये मोठा वाटा असलेल्या हल्दीरामचे (Haldiram) 51 टक्के शेअर्स खरेदी करण्याची तयारी सुरू असल्याची बातमी आहे. त्यासाठी हल्दीरामने आपल्या कंपनीने मुल्यांकन हे 831 कोटींहून जास्त असल्याचं सांगितलं आहे. पण कमीत कमी जाहिरात आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या जिवावर हल्दीरामची उत्पादनं आता घराघरात पोहोचली आहेत. हल्दीरामचा व्यवसाय हा चार अगरवाल भावांकडून चालवण्यात येत असून त्याची एकत्रित वार्षिक उलाढाल ही 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.
महाराष्ट्रामध्ये हल्दीराम म्हटल्यावर समोर येतं ते नागपूर. नागपूरमधील हल्दीरामची चेन सध्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आहे. संत्रा बर्फी, भूजिया, रसगुल्ले यासह हल्दीरामचे अनेक प्रोडक्ट आता घराघरात जाऊन पोहोचले. पण नागपूर व्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता आणि बिकानेरमध्येही हल्दीरामचं साम्राज्य आहे. हल्दीरामचा दिल्लीतील व्यवसाय हा मनोहरलाल आणि मधुसूदन अग्रवाल हे बंधू चालवतात. नागपूरचा व्यवसाय सर्वात मोठे बंधू शिव किशन अग्रवाल चालवतात. बिकानेरचा व्यवसाय शिव रतन अग्रवाल यांच्याकडे आहे. कोलकात्याच्या व्यवसायाची जबाबदारी रामेश्वरलाल यांचा मुलगा प्रभू अग्रवाल यांच्यावर आहे. हे चारही व्यवसाय एकमेकांपासून स्वतंत्र आहेत.
अगरवाल कुटुंबाकडून चालवण्यात येणाऱ्या या हल्दीराम स्नॅक चेनची एकत्रित वार्षिक उलाढाल ही 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. मॅकडोनाल्ड्स आणि डॉमिनोजच्या एकत्रित उलाढालीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. विशेष म्हणजे कमीत कमी जाहिराती करणारे आणि गुणवत्तापूर्ण असलेल्या या उत्पादनांमुळे हल्दीराम आज घराघरात पोहोचलं आहे.
Haldiram History : हल्दीराम हे नाव कसं पडलं?
अगरवाल कुटुंबीय हे मूळचे बिकानेर (Bikaner) या शहरातील. अगरवाल कुटुंबातील गंगा बिशन अगरवाल (Ganga Bishen Agarwal) या मुलाचा जन्म 1908 सालचा. लहानपणी त्याला हल्दीराम या नावाने हाक मारली जायची. हल्दीराम हा 11 वर्षांचा असल्यापासून त्याच्या वडिलांना भुजिया शेव (Bhujia) तयार करणे आणि त्याची विक्री करण्यामध्ये मदत करायचा. नंतर जरा मोठा झाल्यावर त्याने स्वतःच्या नावाने म्हणजे हल्दीराम या ब्रॅंडने भुजिया विक्री सुरू केली.
गंगा बिशनला मूलचंद, सत्यनारायण आणि रामेश्वरलाल अशी तीन मुलं होती. कोलकात्यात आल्यानंतर गंगा बिशनने हल्दीराम बुजियावाला या नावाने कंपनी सुरू केली. कंपनी स्थिरस्थावर झाल्यानंतर गंगा बिशनने ती रामेश्वरलाल आणि सत्यनारायण या दोघांच्या हवाली केली. त्यानंतर मूलचंदने बिकानेरमध्ये स्वतःची कंपनी सुरू केली. मूलचंदला एकूण चार मुलं आणि एक मुलगी. त्यांनीच हल्दीरामचे स्नॅक्स प्रोडक्ट नावारूपास आणले.
मूलचंदचा मोठा मुलगा शिव किशन अगरवाल आणि त्याची मुलगी सरस्वतीने नागपूरमध्ये हल्दीरामचा व्यवसाय सुरू केला. तर त्याची इतर दोन लहान मुलं, मनोहरलाल आणि मधुसुधन यांनी दिल्लीमध्ये 1984 साली व्यवसाय सुरू केला. तर सर्वात लहान मुलगा शिव रतन याने बिकानेरमधील व्यवसाय पुढे चालू ठेवला.
सध्या हल्दीरामच्या चार शहरांतील कंपन्या कोण चालवतंय?
- दिल्ली - मनोहरलाल आणि मधुसुधन अगरवाल
- नागपूर - शिव किशन अगरवाल
- बिकानेर - शिव रतन अगरवाल
- कोलकाता - रामेश्वरलाल यांचा मुलगा प्रभू अगरवाल
हे चारही व्यवसाय सध्या स्वतंत्र्यपणे सुरू आहे. त्यामध्ये दिल्लीमधील हल्दीरामची वार्षिक उलाढाल ही सर्वाधिक असून ती 5000 कोटींच्या जवळपास आहे. त्यानंतर नागपूरमधील उलाढाल ही 4000 कोटी रुपये इतकी आहे. तर बिकानेरची उलाढाल ही 1600 कोटी रुपये इतकी आहे.
ही बातमी वाचा: