Earthquake In Nagpur : भूकंप (Earthquake) हे नाव जरी उच्चारले तरी अंगाचा थरकाप उडवतो. क्षणात होत्याच नव्हतं करणारे अनेक भूकंपाच्या घटना जगभरात घडत असतात. त्याची विदारक चित्र बघितले की निसर्गापुढे मनुष्य किती खुजा आहे, हे क्षणात लक्षात येतं. मात्र हाच भूकंप कधी आपल्या आजूबाजूला झाला तर? कल्पना देखील करवत नाही. मात्र, असे असले तरी उपराजधानी नागपुरात (Nagpur) काल, 3 एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा सलग दुसरा भूकंपाचा धक्का असल्याचे बोललं जातंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय. नागपूर परिसरात 2. 5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आलीय. मात्र, भूकंपाची 2.5 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचेही सांगण्यात आलंय.   


भूकंपाची तीव्रता 2.5 रिश्टर स्केल 


नागपुरलगतच्या  शेजारच्या काही भागासह मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगणाचा काही भाग हा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून मोडतो. काल 3 एप्रिलच्या दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय. नागपूर परिसरात 2.5 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदविण्यात आलीय. उत्तर नागपुरातील सिललेवाडा हे या भूकंपाचे केंद्र असून जमीनीच्या 5 किमी आंत ह्याचे केंद्र आहे. तर ही घटना धोकादायक नसून अशा प्रकारचे भूकंप होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी, 27 मार्च रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नागपूर जिल्ह्यात तीन लहान भूकंपाची नोंद केली होती. त्यावेळी हिंगणा येथील झिलपी तलावाजवळ दुपारी 2.53 वाजता 2.8 तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कांद्रीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्यांची नोंद झाली होती.


भूकंप कसा होतो? 


भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्याच्या 'भूकंप लहरी' तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणं, हलणं, जमिनीला भेगा, कंपन होणं तसेच अचानक काही क्षण हादरणं यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के आणि लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.


इतर महत्वाच्या बातम्या