नागपूर : नृत्यांगना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आणि हुल्लडबाजी हे समीकरण झालं आहे. नागपुरातही (Nagpur) गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या. शिवाय हुल्लडबाज तरुणांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार (Lathicharge) देखील केला.


हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले


नागपुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी झाली. गणेश विसर्जनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या उत्तर अंबाझरी येथील हिलटॉप एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी (29 सप्टेंबर) गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीला बघण्यासाठी शहरातील तरुणांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, गौतमी पाटील कार्यक्रमासाठी सुमारे दोन तास उशिरा पोहोचली. त्यामुळे काही तरुण संतापले. त्यानंतर तिचं नृत्य सुरु होताच तरुणांनी जोरदार गोंधळ सुरु केला. अनेक तरुण तिथे लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर उभे झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या खुर्च्या तुटल्या. काही हुल्लडबाजांनी तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले. 


पोलिसांकडून हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार


आयोजक आणि पोलिसांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही हुल्लडबाज तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाठीमागची गर्दी वारंवार समोरच्यांना धक्का देत असल्यामुळे अनेक वेळेला समोरचे बेरिकेट खाली कोसळले. कार्यक्रमात आणखी काही अनर्थ घडू नये, म्हणून र्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यानंतर मात्र हुल्लडबाज तरुणांना कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर उरलेला लावणी कार्यक्रम शांततेत पार पडला. आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ किंवा हुल्लडबाजी होऊ नये, यासाठी महिलांना कार्यक्रमाच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलं होतं. तरी देखील काही तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घातलाच. 


दिंडोरीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजीला फाटा


तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेडमध्ये हुल्लडबाजीला फाटा देण्यात आला. दिंडोरीच्या एकता मित्र मंडळाने गौतमी पाटील यांचा कार्यक्रम कुठलीही हुल्लडबाजी न होता पार पाडला. महिलांसह रसिकांनी कार्यक्रमांचा खास आस्वाद घेताना गौतमी पाटीलने थेट व्यासपीठावरुन खाली उतरुन महिला प्रेक्षकांमध्ये जाऊन नृत्याची अदाकारी यावेळी सादर केली. आयोजकांचे सुयोग्य नियोजन पाहून गौतमी पाटीलनेही समाधान व्यक्त केले.


हेही वाचा


Nashik Gautami Patil : थेट शाळेच्या आवारात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम, नाशिकच्या दिंडोरीतील प्रकार, शिक्षणमंत्री म्हणाले?