Patole Vs Wadettiwar : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला होता. अप्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या टोले लगावले जात होता. परंतु आता आपल्यातील वाद मिटल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नाना पटोले आणि माझ्यातील वाद आता संपलेला आहे. अंतर्गत वादावर आम्ही आता पडदा टाकलेला आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.


आगामी काळात महाविकास आघाडीची एकजूट राहावी यासाठी आघाडीतील सर्वच नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. आघाडी मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला होता. यावर नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांचा निर्णय बंद खोलीत निर्णय करु. विजय वडेट्टीवार एवढे मोठे नेते नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.  


अंतर्गत विषयावर आम्ही पडदा टाकला आहे


याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, "प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माझ्यातील वाद आता संपलेला आहे. त्यांनी काय म्हटलं, मी काय म्हटलं हा अंतर्गत विषय होता आणि अंतर्गत विषयावर आम्ही आता पडदा टाकलेला आहे. यापुढे कुठलाही विषय शिल्लक नाही. दिल्लीपर्यंत नेण्याचा काही विषय नाही. महाराष्ट्रात समज गैरसमजातून झालेले काही प्रश्न आहे. या विषयाला आम्ही फुल स्टॉप दिलेला आहे."


'आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या'


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. याबाबत कर्नाटकात जाऊन प्रचार करणाऱ्या राज्य सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील सत्ताधारी कर्नाटकात जाऊन ढोल वाजवत होते. त्यांचे ढोल वाजवून झाले असतील आणि निवडणुका संपल्या असेल तर त्यांनी आता महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. जर तुमच्या पोटाची चिंता मिटली असेल तर आता शेतकऱ्यांच्या पोटाची चिंता करा आणि शेतकऱ्याला त्वरित मदत करा. उद्ध्वस्त झालेला शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा लावून बसला आहे. त्यांचं होतं नव्हतं ते सगळं गेलं. प्रचंड नुकसान झालं आहे. आता कर्नाटक काय व्हायचं ते होणार आहे, त्यांनी आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे आणि सरकारला सूचना आहे."


'सत्ता संघर्षाचा निकाल त्यांच्याविरोधात जाणार'


"सत्ता संघर्षाचा निकाल एक-दोन दिवसात अपेक्षित आहे. एकूण जे वातावरण दिसत आहे आणि निर्माण केलं आहे. त्याच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्यासंदर्भात संभ्रम निर्माण करण्यात आला. आता सत्ता संघर्षाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल, अशीच सगळीकडे चर्चा आहे. हा निकाल नक्की त्यांच्याविरोधात जाणार आहे. निकाल दोन दिवसात लागल्यानंतर सत्ता संघर्षावरचा अंतिम निर्णय हाच सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे," अशी प्रतिक्रिया विजय वडट्टेवारी यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत दिली.