नागपूर : नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवासापासून शेतकरी कर्जमाफी, सावरकर तसंच सामनाच्या मुद्द्यावरुन गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र आजच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र आले. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले, ज्येष्ठ आमदार फोटोसेशनसाठी एकत्र जमले. परंतु या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे काही काळ देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीबाबत चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं.


महाविकास आघाडीचं हे पहिलंच अधिवेशन आहे. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्यांचं एकत्रित फोटोसेशन करण्याची विधीमंडळाची प्रथा-परंपरा आहे. ज्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र येतात. याच परंपरेनुसार सर्वपक्षीय आमदार आज विधानभवनाच्या आवारात एकत्र आले आणि एक मनाने, एक दिलाने फोटोसेशन केलं.


खरंतर विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरुन गदारोळ करत मागील चार दिवस गाजवले. आजही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधीमंडळ अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. पण सर्व आमदार खांद्याला खांदा लावून एकाच फ्रेममध्ये सामील झाले. परंतु या फोटोसेशनसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही न दिसल्याने चर्चा रंगली होती.


वैयक्तिक कारणाममुळे विरोधी पक्षनेते गैरहजर : नाना पटोले
दरम्यान, "विरोधी पक्षनेत्यांना बोलावलं होतं. मात्र वैयक्तिक कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत," अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीवर दिली. ते म्हणाले की, "लोकसभेप्रमाणे राज्यातील विधीमंडळात नवीन पायंडा पडण्याचा माझा प्रयत्न आहे. विरोधी पक्ष नेत्यांना बोलावले होते मात्र वैयक्तिक कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. विधासनभा निवडणुकीत केलेल्या वक्तव्यांशी काही संबंध नाही, कारण मला सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान आहेत. कितीही मतभेद असले तरी आम्ही एकत्र आहोत हे स्पिरीट लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे."