नागपूर : आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेनंतर विरोधक मतदान मागू शकतात या शक्यतेमुळे सत्ताधारी आमदारांची चांगलीच धांदल उडाली. आज सकाळपासून विधानसभेत पुरवण्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजता राज्यपालांच्या चहापानाच्या नियोजित कार्यक्रमासाठी साडे सात पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र पुन्हा सभागृहात येण्याऐवजी अनेक आमदारांनी काढता पाय घेतला आणि सत्ताधाऱ्यांची संख्या रोडावली. बेसावध सत्ताधाऱ्यांचा अंदाज घेत विरोधकांनी पुरवण्या मागण्या मान्य करण्यापूर्वी मतदानाची मागणी करण्याची तयारी केली होती. अशा स्थितीत जर सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ कमी असते तर प्रस्ताव फेटाळण्यात आला असता. तसेच सरकार अल्पमतात येण्याचा धोका निर्माण झाला असता.


याची जाणीव होताच सत्ताधारी पक्षातील गट नेते आणि प्रतोदांना त्यांच्या आमदारांना तात्काळ सभागृहात हजर राहण्याच्या सूचना धाडल्या. त्यानंतर इकडे तिकडे पांगलेले सत्ताधारी आमदार सभागृहात हजेरी लावण्यासाठी पळत येताना पाहायला मिळाले. सभागृहात तळ ठोकून बसणाऱ्या अजित पवारांनी मग आलेल्या नवख्या आमदारांची शाळा घेतली तर काही ज्येष्ठ आमदारांना आल्याबद्दल हात जोडून आभार मानले. यामुळे विधानभवनातील वातावरण एकमेकांना चिमटे आणि टोले देताना चांगलेच रंगले होते.

हे ही वाचा-  मोर्चेकरी दहा तर सुरक्षेला 35 पोलीस, मटणाच्या हमी भावासाठी असाही एक लक्षवेधी मोर्चा

काही वेळातच सत्ताधारी बाकावर आमदार फुल्ल मेजोरीटीत हजर झाले तर विरोधकांपैकी फक्त भाषणापुरतेच आमदार असे चित्र दिसले. त्यामुळे विरोधकांच्या फक्त मतदानाच्या हुलने बेसावध सत्ताधाऱ्यांची एकच धावपळ उडालेली आज विधानभवनात पाहायला मिळाली. दरम्यान, विधानसभेत पुरवण्या मागण्या बहुमताने संमत झाल्या. आम्ही व्हीप काढला होता म्हणून आमदार धावपळ करत आले. त्यांना व्हीपचं महत्व माहिती आहे. आमच्यावर असा बेसावध वार कोणी करू शकत नाही, असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले.

तर आम्ही सत्ताधारी अलर्ट आहोत. कुठल्याही मतदानाला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत. विरोधक काय प्रस्ताव फेटाळणार, जनतेने त्यांना फेटाळलंय. आता तर आमचा बहुमताचा आकडा 170 आहे. हळू हळू बघा आम्ही 190 पार करू, असे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेमधे मांडलेल्या मुद्यावर सरकारकडून उत्तर न आल्यामुळे भाजपचा सभात्याग

तर पुरवणी मागण्यांच्या चर्चेमधे मांडलेल्या मुद्यावर सरकारकडून उत्तर न आल्यामुळे भाजपकडून सभात्याग करण्यात आला. आरेमधे निवासी झोन करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली. हा भूखंड हडप करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदारांनी केला होता त्याचे कोणतेही उत्तर सरकारने दिले नाही याचा अर्थ हा भूखंड हडप करण्याच डाव आहे असा होतो. भाजपने त्याचा निषेध केला. राज्यातील मच्छीमारांचे अवकाळी पाऊस आणि वादळांमुळे नुकसान झाले आहे त्यांना मदत द्या अशी मागणी भाजपने केली होती त्याबद्दल कोणतेही उत्तर सरकारने दिले नाही. फ्रि होल्ड प्राँपर्टी करताना घेण्यात येणारा कर हा 10 टक्के ऐवजी 1 टक्के घेण्यात यावा. या तीन मुद्द्यावर उत्तरे न आल्याने सभात्याग करण्यात आला असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा - मोर्चेकरी दहा तर सुरक्षेला 35 पोलीस, मटणाच्या हमी भावासाठी असाही एक लक्षवेधी मोर्चा