नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना होणारा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांना भेटले आणि कारवाईची मागणी केली. काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर जो महानगरपालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला त्यावरून वातावरण पेटले आहे.


गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे जेव्हा विभागीय आयुक्त कार्यालयात आले त्यावेळी इतर नगरसेवकांनी चक्क टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. साठवणे हे सतरंजीपुरा म्हणजे ज्याठिकाणी सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या कंटेन्मेंट झोनचे नगरसेवक आहेत. एकदा क्वॉरंटाईनमधून आलेल्या लोकांचे अनुभव ऐकल्यामुळे परत इतर लोकांना नेण्यासाठी आलेल्या प्रशासनासाठी लोकांनी घराचे दरवाजेच उघडले नाही. त्यांना वेळ द्या मानसिक तयारी होऊ द्या, असे नगरसेवक नितीन साठवणे यांचे म्हणणे होते. मात्र साठवणे यांचा आरोप आहे की असं म्हटल्यामुळे त्यांच्यावर तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. खास म्हणजे या नगरसेवकांबरोबर काँग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि इतर पदाधिकारीही तेथे उपस्थित होते.


महत्वाचे म्हणजे भाजपाशासित महानगरपालिकेत आता मुंढे विरोधात भाजपसह गटातटात वाटली गेलेली काँग्रेसही एक झाली आहे. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आले आणि थोड्याच दिवसात त्यांना विरोध सुरू झाला. पण गेल्या काही दिवसात प्रशासनाच्या विरोधात नागपूरकर जनताही नेत्यांबरोबर रस्त्यावर उतरलेली दिसते आहे.


तुकाराम मुंढेना विरोध




  • 28 जानेवारीला तुकाराम मुंढे यांनी नागपूर मनपाचा चार्ज घेतला.

  • विरोधी पक्ष आणि कॉंग्रेस नेते तानाजी वनवे यांनी तुकाराम मुंढे भेटत नाहीत, यावर आक्षेप घेतला.

  • नंतर हाच सूर भाजप नेता आणि महापौर संदीप जोशी यांनीही गिरवला.

  • कोरोना लॉकडाऊनमध्ये महापौरांनी प्रशासनाची क्वॉरंटाईन पद्धत चुकीची असून रुग्ण त्यामुळे ही वाढू शकतात ही भूमिका घेतली

  • भाजी बाजारांचे वाईट व्यवस्थापन आणि इतर भेटीचे विषय घेऊन नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी आंदोलने

  • कोविड हॉस्पिटल आमच्या बिल्डिंगला लागून नको म्हणत केटी नगर नागरिक आणि आमदार विकास ठाकरे रस्त्यावर

  • पाच दिवस आधी हिल रोड आणि पांढराबोडी कंटेन्मेंट झोन विनाकारण जास्त दिवस ठेवत असल्याचा आरोप करत सलग दोन दिवस नागरिक आणि आमदार ठाकरे मुंढेंच्या विरोधात रस्त्यावर

  • काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणेवर गुन्हा दाखल

  • काल मोमीनपुरा, भागवाघर चौक येथील नागरिक पोलिसांच्या वागणुकीवर नाराज होत रस्त्यावर

  • काल महानगरपालिकेत ऐतिहासिक अशी भाजप-कॉंग्रेसची एकत्र पत्रकार परिषद

  • आज काँग्रेस नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे दाद मागायला गेले


आज विभागीय आयुक्तांनी नगरसेवकांशी काही प्रभाग निहाय चर्चा करण्याचे आश्वासन दिले. काही भागात क्वॉरंटाईन कंटेन्मेंट झोनमध्ये लोकांच्या संयमाचा बांध तुटला असला तरी त्याला मार्ग नाही.


Protest Against Tukaram Mundhe | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले