कालच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरात रुग्ण बरे होण्याचा नागपूरचं प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे आणि नागपुरात रुग्ण संख्या कमी होत असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने वेळीच केलेल्या उपाययोजनांना त्याचे श्रेय दिले होते. त्यानंतर आज नागपूर पोलीस आयुक्त यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत पोलिसांनी अडीच महिने दिलेल्या योगदानाला विसरता कामा नये याची आठवण करून दिली.
पोलीस 24 तास रस्त्यावर आहेत, त्यामुळे त्यांचे योगदान खूप मोठे आहे. एवढेच नाही तर सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा सारखे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या कन्टेन्मेंट झोनमध्ये परिस्थिती सांभाळताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण ही झाली. कन्टेंन्मेंट झोनमध्ये काम करणारे अनेक पोलीस गेले अनेक आठवडे आपल्या घरी परतले नाहीयेत. पोलिस दलाने मिळून चोखपणे त्यांचे काम केले म्हणून आज नागपुरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.
महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पोलिसांबद्दल तक्रारीचा सूर लगावला होता, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र, नागपुरात कोरोना विरोधात जे काही यश मिळत आहे ते पोलीस, आरोग्य विभाग, महापालिका आणि महसूल विभागाचा संयुक्त यश आहे. एका विभागाने ही कामगिरी केलेली नाही याचा पुनरुच्चार पोलीस आयुक्तांनी केला.
नागपूरमध्ये आज सकाळी 8 कोरोना रुग्ण वाढले आहेत. नागपुरात एकूण रुग्ण संख्या 441 झाली आहे तर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली आहे तर आतापर्यंत 345 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे आता नागपुरात साधारणत: 95 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.