Nagpur Municipal Corporation Coronavirus Guidelines : केंद्र शासनाकडून (Coronavirus Guidelines Issued India Health Ministers) जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात (Nagpur) विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार आजपासून, 24 डिसेंबरपासून शहरात दाखल होणाऱ्या 2 टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी दिले.


कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशाच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेत यासंबंधी बैठक पार पडली. नागपूर शहरात दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. आजपासून या विमानातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी दोन टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी नंतर घेण्यात आलेले नमूने मेडिकल, एम्स आणि मेयो येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळ प्रशासनाशी समन्वयाने कार्य करून चाचणी करण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले आहे.


चाचणीसाठी 39 केंद्र


शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे 39 चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण 43 लाख 85 हजार 364 डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन हॉस्पीटल, आयुष दवाखाना या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय GMC (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय IGGMC (मेयो) येथेही ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेता बेड्स तयार ठेवण्याची सूचना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केली आहे.


लक्षणे असल्यास त्वरीत चाचणी करा


कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरात मनपाच्या दहाही झोनमध्ये 39चाचणी केंद्रांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे. अँटिजेन (Antigen) आणि आरटीपीसीआर (RTPCR) अशा दोन्ही चाचण्या या केंद्रांवर करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.


ही बातमी देखील वाचा


नागपूर एम्सलाही लागला DAMA चा आजार; रुग्णाच्या नातेवाईकाची व्यथा