Nagpur News : गरिबांसाठी नागपुरात हक्काचे रुग्णालय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (IGGMC) ओळखले जातात. मात्र, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) उभारल्यानंतर येथे तातडीने उपचार मिळतील या आशेवर मोठ्या संख्येत रुग्ण येत आहेत. परंतु, अपघातामध्ये गंभीर दुखापत झालेल्या एका रुग्णाला शस्त्रक्रियेची तातडीने गरज असताना चोवीस तास ताटकळत ठेवले गेले. तपासणी केल्यानंतर डामा (डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाईस) Discharge Against Medical Advice घेण्यास भाग पाडले. एम्समधील अनुभवाने या नातेवाईकाच्या रुग्णाला 'आपल्या गावचा डॉक्टर बरा' अशी व्यथा सांगावी लागली. या रुग्णाने अखेर ब्रह्मपुरीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया उरकून घ्यावी लागली.


ब्रह्मपुरीतील आरोग्य विभागात फायलेरिया विभागात कार्यरत 32 वर्षीय युवक अपघातामध्ये जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून 12 डिसेंबरला मध्यरात्रीनंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत हलवले. एम्समध्ये उपचार होतील या आशेवर रुग्णवाहिकेतून आले. रात्रभर रुग्णाला स्ट्रेचरवरच ठेवण्यात आले. या दरम्यान एक्स रे, सोनोग्राफी करण्यात आली. अस्थिरोग विभागातील डॉक्टरांनी रुग्णाला दुपारी एक वाजता बघितले होते. रुग्णाच्या मांडीचे हाड मोडले होते. वेदनेने विव्हळत असल्याने या रुग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. मात्र शस्त्रक्रियेसाठी पंधरा दिवस लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी मेडिकलमध्ये किंवा इतर रुग्णालयात रेफर करण्याची विनंती केली. मात्र डॉक्टरांनी रेफर करणार नाही, डिस्चार्ज घ्या, असा सल्ला दिला. अखेर नातेवाईकांनी डिस्चार्ज घेतला मात्र एम्सच्या डायरीत 'डामा' (डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल अॅडवाईस) अशी नोंद केली. यासंदर्भात एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.


GMC, IGGMC च्या वाटेवर AIIMS


ब्रह्मपुरीतून एम्समध्ये उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी वेटिंग लिस्टमुळे रुग्णावरील शस्त्रक्रियेसाठी 15 दिवस थांबावे लागेल असे स्पष्ट केले. नातेवाईकांना रुग्णाच्या वेदना बघवत नसल्याने त्यांनी परत जिथून आणले तेथेच परत नेले. अनेकांकडून मदत मागत येथील एका खासगी रुग्णालयात बुधवार 14 डिसेंबरला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मेयो, मेडिकलमध्येही अशाप्रकारे वेटिंग लिस्ट असल्याने रुग्ण खासगीत शस्त्रक्रियेसाठी मेडिकल, मेयोतून डामा घेतात. त्याच वाटेवर आता एम्सची वाटचाल सुरु झाली असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आता रुग्णाचे नातेवाईकाने बोलून दाखवत आहेत.


तक्रारींकडे दुर्लक्ष


एम्स नागपूरमध्ये रुग्णाला तक्रार करण्यासाठीही चांगलीच दमछाक करावी लागत असल्याचा अनुभव एका दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितला. मुख्य प्रवेशद्वारावरील मदत केंद्रांवर रुग्णाच्या नातेवाईकाने तक्रार कशी करावी, हे विचारल्यावर तब्बल त्याला दोन तास या विभागातून त्या विभागाकडे फिरवण्यात आले. त्यानंतर एमओ (मेडिकल ऑफिसर) यांना भेटून तक्रार द्या असे सांगण्यात आले. यानंतर चिडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने एक कोरा कागद घेऊन त्यावर तक्रार लिहून फक्त पोचपावती मागितली तर त्याला एमओला (Medical Officer) भेटू द्या असे सांगत पुन्हा अर्था तास बसवून ठेवण्यात आले. मात्र रुग्णाने सकाळपासून काही खाल्ले नाही फक्त तुम्ही फिरवत आहात. माझी तक्रार घ्या आणि पोचपावती द्या असे चिडून सांगितल्यावर त्याला पोचपावती देण्यात आली. मे 2022 मध्ये तक्रार करण्यात आल्यावरही आतापर्यंतही त्यासंदर्भात कुठलाही संपर्क एम्स प्रशासनाने साधला नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. रुग्णाने केलेल्या तक्रारीची प्रत 'एबीपी माझा'कडे आहे.


ही बातमी देखील वाचा


Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनावर शंभर कोटींचे खर्च, तरी हे काय? खानपानाच्या व्यवस्थेवरुन अजित पवार संतापले