Arvind Kejriwal in Nagpur for Vipassana : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज संध्याकाळी नागपुरात (Nagpur) पोहोचले. विपश्यनेसाठी ते नागपुरात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल हे नागपूर जिल्ह्यातील फेटरी (Dhamma Naga Vipassana Meditation Centre) गावातील धम्म नागा विपश्यना केंद्रात विपश्यना करणार आहेत.


नागपूर विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, त्यांची नागपूर भेट विपश्यनेसाठी आहे. 1996 पासून ते विपश्यना साधना करत आहेत. प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा मला काही दिवसांचा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा मी विपश्यना साधना करतो. विपश्यना विद्या ही भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शिकवली होती. याद्वारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. विपश्यना साधनेमुळे मलाही वैयक्तिकरित्या जीवनात अनेक फायदे झाले असल्याचेही यावेळी केजरीवाल म्हणाले. तसेच वेळ मिळेल तेव्हा प्रत्येकाने एकवेळा विपश्यना ध्यान करावे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. देशाच्या ह्रदयस्थानी नागपुरात विपश्यना केंद्र असल्याने मी साधनेसाठी आलो असल्याचेही यावेळी ते म्हणाले.


...म्हणून नागपूरात आलोय


विपश्यनेसाठी नागपूर का निवडलं असा प्रश्न विचारल्यावर अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं. अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मी दरवर्षी विपश्यना केंद्रात जातो. ज्या ठिकाणी विपश्यना सुरू असेल त्या ठिकाणी मी जाणं पसंत करतो. देशात अनेक केंद्र आहेत. मागच्या वर्षी मी जयपूरला गेलो होतो. यावर्षी नागपूरच्या केंद्रावर विपश्यना सुरू आहे त्यामुळे मी इथे आलो आहे.' असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे.


विपश्यना साधना म्हणजे...


विपश्यना ही तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना ही जगभरात पोहोचलेली आहे. विपश्यना या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणं असा होतो. विपश्यना ध्यान पद्धती ही कुणालाही करता येते. साधारण या वर्गाचा कालावधी हा सात ते दहा दिवसांचा असतो. या कालावधीत पूर्ण मौन पाळणं आवश्यक असतं. ज्या केंद्रावर विपश्यना घेतली जाणार आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या भोजनाची तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आलेली असते. या कालावधीत सात्विक भोजनावर भर दिला जातो. या दहा दिवसांमध्ये अपेयपान, धूम्रपान, मांसाहार वर्ज्य असतो.


ही बातमी देखील वाचा...


Mihan Nagpur : मिहानमधील दसॉल्ट-रिलायन्सच्या संयंत्रात राफेलच्या स्पेअरपार्टची निर्मिती