Nagpur GMC News : विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असणारे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) GMC पुन्हा एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आले आहे. शवगारातून आपल्या नातेवाईकांचे मृतहेद मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार अधिष्ठाता (Dean), पोलीस निरीक्षक (Nagpur Police), आमदार (MLA) मंत्र्यांकडे तक्रारदारांनी करुनही या प्रकारावर कारवाई झाली नाही.


मृतदेह लवकर पाहिजे... निलगिरी तेल, पांढरं कापड पाहिजे. मृतदेहाला औषध लावायचे आहे...यासाठी दोन हजार रुपये द्या.. अशी थेट मागणी मेडिकलच्या शवागारात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेले संबंधित नातेवाईक अवाक्षरही न काढता पाचशे हजार नव्हेतर दोन हजार रुपये काढून कर्मचाऱ्याच्या हातावर ठेवतात. त्यानंतर पुढच्या प्रक्रियेला गती येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे सोपस्कार पूर्ण केले जातात. या गैरप्रकाराची तक्रार मेडिकलचे अधिष्ठाता, अजनी पोलिस निरीक्षक, आमदार, मंत्र्यांना तक्रारकर्त्यांनी दिली आहे. मात्र दखल घेतली नसल्याची माहिती जनजागरण कृती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. शवविच्छेदगृहात मृतदेहासाठी निलगिरी, पांढरे कापड हे साहित्य शासनाकडून मोफत मिळते.


दररोज 12 ते 15 शवविच्छेदन


शवविच्छेदनगृहातील (postmortem) मृतदेह वरकमाईचे साधन यानंतरही शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी नातेवाईकांकडून पैसे घेत असून हे या कर्मचाऱ्यांचे वरकमाईचे साधन बनले आहे. दररोज मेडिकलच्या शवविच्छेदन विभागात 12 ते 15 शवविच्छेदन होतात. ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना किमान पाचशे ते हजार रुपये दिल्याशिवाय कोणतीच प्रक्रिया सुरु होत नाही. असा अनुभव आल्यानंतरच किशोर खडसे यांनी अधिष्ठातांकडे तक्रार केली. न्यायवैद्यक शास्त्र विभागातील हे कर्मचारी सर्रास 'वरकमाई" करत आहेत. रुग्णालयाच्या शवागारात महिन्याला सुमारे साडेतीनशेवर शवविच्छेदन केले जातात. एका मृतदेहासाठी 500 रुपये याप्रमाणे महिन्याला येथील कर्मचारी पाऊणे दोन लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांकडून महिन्याला वसूल करत असतात.


पोलिसांकडूनही उकळतात पैसे


ओमप्रकाश हे पोलीस आहेत. त्यांनाही मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात होणाऱ्या गैरप्रकाराचा फटका बसला आहे. त्यांनी देखील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र या तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुःखी कष्टी नातेवाईकांच्या दुःखाचा सौदा केला जातो, मात्र प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत डॉ. रवी चंदनखेडे, सचिन देशभ्रतार, किशोर खडसे, रिंकू खडसे यांनी केला आहे.


औषधींसाठीही खर्च


रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नोंदणी फक्त वीस रुपयांत केली जाते. मात्र डॉक्टरांकडून लिहून देण्यात येणार औषधच रुग्णालयात मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरच्या खासगी औषधालयातून औषधी विकत घ्याव्या लागतात. याशिवाय इतर वैद्यकीय साहित्य देखील रुग्णाच्या नातेवाईकाला खरेदी करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. मात्र रुग्णाला आवश्यक सर्व औषधी रुग्णालयातच उपलब्ध व्हाव्या अशी मागणी अनेक संस्थांकडून यापूर्वीही करण्यात आली आहे.


ही बातमी देखील वाचा...


AIIMS Nagpur : नागपूर एम्सलाही लागला DAMA चा आजार; रुग्णाच्या नातेवाईकाची व्यथा