वर्धा : आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे आपल्या बहिणीला प्राण गमवावे लागले, असा आरोप प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील पाल यांनी केला आहे. वर्ध्यातल्या सावंगीतील रुग्णालयात सुनील पाल यांची बहीण शारदा पाल दोन दिवसांपासून भरती होत्या.

दोन दिवसांपासून समाधानकारक उपचार होत नसल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. शिकाऊ डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये उपचार होत असल्याचं पाल यांचं म्हणणं आहे. सुनील पाल यांनी आयसीयूतील एक व्हिडिओसुद्धा काढला आहे.

सावंगी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचं सांगत पाल यांनी आपल्या बहिणीला उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात नेलं. पण तिथे शारदा पाल यांचा मृत्यू झाला. सावंगी रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे बहिणीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे.

सुनील पाल यांच्या आरोपांचं आचार्य विनोबा भावे रुग्णालय प्रशासनाने खंडन केलं आहे. उलट, सुनिल पाल यांनीच रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शिरुन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

पाल यांच्या बहिणीला सुरुवातीला हिंगणघाट येथे उपचार करुन आणले होते. 'पॅनक्रिअॅटीस' या आजाराने त्यांची बहीण त्रस्त होती. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. आयसीयूत प्रशिक्षित डॉक्टर होते, उपचारात हलगर्जी केली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.