नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता रात्री 10 नंतर फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या 63 जणांविरुद्ध नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 23 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.


पर्यावरणाचे हित लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत आणि विकण्याबाबत दिशा-निर्देश जारी केले होते. त्यानुसार, रात्री 10 वाजेनंतर फटाके फोडता येणार नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.


प्रदूषण रोखण्यासाठी मदत करू पाहणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे नागरिकांनी आणि फटाके विक्रेत्यांनी पालन करावे, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनानही केलं होतं. शहरात 10 वाजेपर्यंत मोठे फटाके फोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथकही तैनात करण्यात आली होती.


मात्र अनेकांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन न करता रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरु ठेवली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्या 63 जणांवर कारवाई केली आहे. दरम्यान कारवाईचाही हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.