नागपूर : राज्यात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये सीएनजीचा दर हा 60 ते 65 रुपये प्रती किलोच्या दरम्यान आहे. मात्र नागपूरकरांना याच सीएनजीसाठी शंभर रुपये प्रती किलो द्यावे लागत आहेत. सीएनजीच्या दरात जवळजवळ 40 रुपये तफावत एकाच राज्यामध्ये कशी असू शकते? काय आहे किंमतीच्या पाठीमागचे गौडबंगाल याचा शोध एबीपी माझाने घेतला आहे.
नागपूरच्या वाडी परिसरातल्या एका सीएनजी पंपावर आज 99.99 प्रती किलो म्हणजेच 100 रुपये प्रती लिटर दराने सीएनजी मिळतो आहे. तीन दिवस आधी तर हाच दर 103 रुपये होता. हा देशातला सगळ्यात महागडा सीएनजी असावा. गुजरातमधल्या सीएनजीच्या किमतीच्या तुलनेत तर नागपुरात मिळणाऱ्या सीएनजी ची किंमत ही अनेक वेळा दुप्पट असते.
सीएनजी किंमत प्रती किलो
- नागपूर- 99.99 रुपये
- मुंबई- 63.50 रुपये
- पुणे- 63.90 रुपये
- गुजरात- 64.99 रुपये
- दिल्ली- 53.04 रुपये
- हैद्राबाद- 69.00 रुपये
सन 2019 मध्ये नागपूरला पहिला सीएनजी पंप आला. आज शहरात पंपांचा आकडा फार वाढला नाही. एकाचे तीन पंप झालेत. हे तिन्ही पंप रॉमॅट या एकाच उद्योगसमूहाच्या मालकीचे आहेत. नागपूरला एवढा महागडा सीएनजी असल्याचे कारण मात्र हा एकाधिकार नसून नागपुरात शहर गॅस वितरण सुविधा प्रणालीच अस्तित्वात नाही हे आहे. नागपूरला सीएनजीची पाईपलाईनच नाही आणि त्यामुळे सरकारची सबसिडी नाही. या कंपनीला गुजरातच्या धईच येथून एलएनजी मागवावा लागतो. मग त्या एलएनजीचे रूपांतर नागपुरात आणून सीएनजीमध्ये होते आणि मगच हे सीएनजी पंपावर येतं आणि त्याचे वितरण केल्या जातं.
फक्त शहरातीलच वाहने नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारी वाहने नागपूर मध्यस्थळी असल्यामुळे येत जात असतात. या सर्व व्यापारालाही महागड्या सीएनजीचा फटका बसतोच. बराच काळ देशातील सर्वात महागडं पेट्रोल व डिझेल घेणाऱ्या नागपूरच्या नागरिकांना आता हे सीएनजी ही एवढे महाग घ्यावे लागत आहे. यातून दिलासा मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Osaka Gas : भारतीय शहरी पाईप गॅस वितरणात जपानच्या ओसाका कंपनीची एन्ट्री
- PNG-CNG Price Hike: PNG-CNG दराचा भडका, सीएनजी 2 रुपयांनी महाग तर घरगुती पाईप गॅसचीही दर वाढ
- Taxi Strike : मुंबईत टॅक्सीचालकांचा संपाचा इशारा, CNG महागल्याने भाडेदरात वाढ करण्याची मागणी