Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (Rashtriya OBC Mahasangh) केली आहे. भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल, रस्त्यावर उतरेल, भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली आहे. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी एबीपी माझासोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 


'भुजबळांसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल'


ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे की, ओबीसी समाजाची सत्य बाजू मांडताना टीका होऊ नये, म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ यांनी मराठा समाजाचा विरोधात कधी भूमिका घेतली नाही. पण ओबीसी आरक्षण धक्का लागू नये, ही मागणी लावून धरली. स्वतःच्या समाजाच्या रक्षणासाठी काम करताना कोणी टीका ( जरांगे ) करत असेल तर, त्याला उत्तर द्यावंच लागेल. भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करेल. रस्त्यावर उतरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.


मराठा आरक्षणाच्या राजपत्रावर आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरू


सरकारने मराठा समाजाला अध्यादेश देताना मंत्री म्हणून भुजबळ यांना विश्वासात घ्यायला हवा होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या राजपत्रावर आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमची लीगल टीम राजपत्रमधील शब्द न शब्द वाचत आहे. त्यात काही आढळला तर आक्षेप घेऊ. सध्या तरी ओबीसी समाजाचा नुकसान होईल असं काहीही आम्हाला त्या अधिसूचनेत आढळलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.


हरिभाऊ राठोडांना जोरदार प्रत्युतर


न्हावी समाजाच्या एका व्यक्तीला जी वागणूक मिळाली. त्यावर चिडून भुजबळ यांनी ती प्रतिक्रिया दिली. न्हावी समाजाने मराठा समाजाच्या लोकांचे केस कापू नये भुजबळांच्या या वक्तव्याशी मी सहमत नाही. हरिभाऊ राठोड यांची उंची माझ्यावर आणि भुजबळवर बोलण्याची नाही. एक फाईल घेऊन ते सगळी कडे फिरतात आणि ओबीसी समाजाची दिशभूल करत आहे. त्यांची भूमिका योग्य असती तर सरकारने त्यांना चर्चेला बोलविले असते. हरिभाऊ राठोड यांनी कधी रस्त्यावर येऊन संघर्ष केला आहे का? असा सवाल करत तायवडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.