नागपूर: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Youth Congress) कुणाल राऊत (Kunal Raut) यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे सुपुत्र आहेत.कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन "मोदी की गॅरंटी" अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळं फासलं होतं. तसेच मोदी या शब्दावर भारत असं स्टिकर लावून पोस्टर्सवर खोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.  


शनिवारी घडलेल्या या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कुही या ठिकाणाहून नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं


पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी (Maharashtra Pradesh Youth Congress) आंदोलन करत  नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले. सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 


सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी, राऊतांचा आरोप 


भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स आणि बॅनर्स नागपूर जिल्हा परिषदेच्या आवारात देखील लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर भारत सरकारव्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.


या योजना कोणासाठी, याचे निकष काय, लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही. तसेच यातून नागरिकांची दिशाभूल करत शासकीय आवारात फक्त पंतप्रधान मोदी हे आपली स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला आहे.


केवळ स्वत:च्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे या निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले. 


ही बातमी वाचा: