Nagpur : काँग्रेस नेते राहुल गांधी  ( Rahul Gandhi ) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मविआतही ( MVA ) चांगलीच धूसपूस पाहायला मिळत असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकरच मातोश्री वर (Matoshree) येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुनच भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला आहे. 'राहुल गांधींनी महाराष्ट्रांत पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी', असा धमकी वजा इशारा  बावनकुळेंनी दिला आहे. 


राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला आहे. राहुल गांधींची अजूनही भूमिका बदललेली नाही, ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही. ते आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 


चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? 


राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळेंनी दिलाय. 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रा' (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात आल्या. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचं जहाजही हेलकावू लागलं होतं. मात्र महाविकास आघाडीचे कॅप्टन असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेत जहाज बुडता बुडता वाचवलं. 


काय म्हणाले होते राहुल गांधी? 


राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान देखील सावरकरांवर टीका केली होती. इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले होते. वाशिम जिल्ह्यातील सभेत त्यांनी सावरकरांवर ताशेरे ओढले होते. एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली होती. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते. त्यामुळे त्यांनी पत्रे लिहायला सुरुवात केली की, आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवं ते घ्या, मला तुरुंगातून बाहेर काढा, असं सावरकर म्हणाले होते, असा दावा राहुल गांधींनी केला होता.


राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी आडनावानरुन झालेल्या शिक्षेनंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर सात्यकी सावरकरांच्या तक्रारीनंतर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सावरकर वादानंतर काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल? राहुल गांधी लवकरच 'मातोश्री'वर येण्याची शक्यता