नागपूर:  नागपूर शहरात 16 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) 'वज्रमूठ सभे'ला अखेर शहर पोलिसांनी (City Police) परवानगी दिली आहे. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. तर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत. 


महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना नागपूर पोलीस आयुक्त म्हणाले, आयोजकांनी आम्हाला 10 हजार लोक या सभेसाठी येतील अशी माहिती दिली आहे. मैदानाची मालकी असलेल्या NIT ने त्यांना मैदानाच्या मालकीची परवानगी दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलीस परवानगी दिली आहे.  


काय आहेत अटी आणि  शर्ती?



  • सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात यावे

  • सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे

  • कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये.

  • सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये.

  •  क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

  • सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत  सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी


दरम्यान मविआच्या नागपूरमधील सभेला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सभेच्या तयारीबद्दल एक वाक्यता नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभेसाठी तयारी सुरू असताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतायत. काँग्रेस आणि ठाकरे गटानंतर आता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सभास्थळाची पाहणी करणार आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :