नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गडकरींसह कर्नाटकातील मोठे नेतेही आरोपी जयेश पुजारीच्या रडारवर आहेत. एका कुख्यात गुन्हेगाराला जेलमधून आर्थिक मदत केली होती. जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेल्या धमकी प्रकरणात आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरविरोधात यू ए पी ए म्हणजेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. नागपूर पोलिसांमधील विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती मिळाली आहे. तसंच जयेश पुजारी उर्फ शाकिरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि दाऊद इब्राहिमपर्यंत जात असल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. त्यामुळं या प्रकरणात नागपुरात दोन गुन्ह्यांची नोंद असतानाही पोलिसांनी यु ए पी ए कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळेला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्या सर्व अनुषंगाने नागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करत असल्याचे ते म्हणाले.
14 जानेवारी आणि 21 मार्चला केले होते धमकीचे कॉल
दरम्यान, बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांथानं केलं होतं धर्म परिवर्तन; मला शाकीर म्हणूनच हाक मारा, चौकशीदरम्यान जयेश कांथाचा हट्ट