नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत चौदा मैल परिसरात प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांच्यात वाद झाला. या वादामुळे प्रियकर तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 वर्षीय प्रणय मोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. चौदा मैल परिसरात एका भाड्याच्या घरात राहणारा प्रणय जवळच्या उड्डाण कंपनीत कामाला होता. तर त्याची प्रेयसी गेले काही दिवस उत्तरप्रदेशात लखनौला गेली होती. ती तिथून परत आल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रणय आणि त्याची प्रेयसी दोघे चौदा मैल परिसरात प्रणय राहत असलेल्या भाड्याच्या घरात भेटले.
मात्र, दोघांमध्ये एकमेकांवरील संशयावरून तेव्हा जोरदार भांडण झाले. त्यावेळी प्रणयने प्रेयसीच्या इतरांशी बोलण्याबद्दल आक्षेप घेत राग व्यक्त केला. याच मुद्द्यावर दोघांचे बराच वेळ वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात अचानकच प्रणयने गळ्यात तारेचा फंदा टाकून गळफास घेतला. त्याच्या प्रेयसीच्या त्याला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र, गळ्यात फास लावून पंख्याला लटकलेल्या प्रणयला उचलून धरण्यात ती अपयशी ठरली. यावेळी तिने शेजाऱ्यांना बोलावले, मात्र ते ही तिसऱ्या माळ्यावरील प्रणयच्या खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत प्रणय निपचित झाला होता.
शेजाऱ्यांच्या मदतीने प्रणयला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आज ( 13 फेब्रुवारी ) कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणारा प्रणय आणि त्याची प्रेयसी दोघे वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी होते आणि नोकरीच्या निमित्ताने नागपुरात राहत होते.
सध्या व्हॅलेंटाईन सप्ताहाची सर्वत्र धूम सुरु आहे. मात्र नागपुरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रेमामध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या वादात आज या युवकाला जीव गमावावा लागला.
नागपुरात प्रेयसीसमोरच प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
13 Feb 2020 11:37 PM (IST)
सध्या व्हॅलेंटाईन सप्ताहाची सर्वत्र धूम सुरु आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हे दिवस साजरे केले जातात. नागपुरात मात्र या सप्ताहात एक दुर्देवी घटना समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -