Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्याआधी विदर्भातील शेतकरी नेत्यांची या यात्रेवरुन नाराजी पुढे आली आहे. राहुल गांधी यांनी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील 'कलावती' या महिला शेतकऱ्याच्या सम्यसेचा मुद्दा संसदेत मांडून देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राष्ट्रीय पटलावर चर्चेत आणले होते. मात्र, आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भातून जात असताना त्यांना यवतमाळ जिल्ह्याचा विसर पडल्याचे मत शेतकरी नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari ) यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधींना शेतकऱ्यांचा विसर पडू नये असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
राहुल गांधींनी यवतमाळ जिल्ह्यात यावं
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील यवतमाळ जिल्ह्याच्या दाभाडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आश्वासनाचे काय झाले? याचे देखील राहुल गांधी यांना या यात्रेच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात येऊन मूल्यमापन करता आले असते असेही किशोर तिवारी म्हणाले. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा मार्ग चुकल्याची टीका किशोर तिवारी यांनी केली. यवतमाळ जिल्हा हा देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्येचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळं राहुल गांधींनी यवतमाळ जिल्ह्यात यावं अशी माझी त्यांना विनंती असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.
राहुल गांधींना शेतकऱ्यांचा विसर पडू नये : विजय जावंधिया
भारत जोडो यात्रेदरम्यान आजपर्यंत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी संदर्भात जास्त बोलत नाहीत. मात्र, राहुल गांधी यांच्या पक्षाचा सरकार आलं तर ते शेतकऱ्यांसाठी काय करणार? ते पण सांगत नसल्याचे मत शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या समस्याकडे पूर्णपमे दुर्लक्ष केलं आहे. राहुल गांधी यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठेही चर्चा केली नाही. निदान यात्रा विदर्भातून जात असताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी असे विजय जावंधिया म्हणाले. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय असावी, त्यात काही वाद नाही. मात्र, त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडू नये अशी माझी त्यांना विनंती असल्याचे शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले.