Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील (Ayodhya) प्रभूश्री राम मंदिरात नुकतीच प्राणप्रतिष्ठा झाली. हा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळा अवघा भारत अनुभवत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे. अनेकांच्या त्याग, परिश्रम आणि योगदानातून हे स्वप्नवत राम मंदिर अस्तित्वात आले आहे. अशातच या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये मराठमोळ्या आणि मूळच्या नागपूरकर असलेल्या वास्तू विशारद अविनाश संगमनेरकर यांचे देखील मौलिक योगदान आहे. तीन वर्षांपासून त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत अयोध्येत राहून राम मंदिर निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे. 


नागपुरातील एका अभियंत्यांचे मौलिक योगदान


तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा आज पूर्ण झाली आहे. या राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आपल्या योगदानाची समिधा अर्पण करण्याची संधी नागपूरचे वास्तू विशारद अविनाश संगमनेरकर यांना मिळाली. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे त्यांना 2020 साली पाचारण करण्यात आले होते.


तीन वर्षांपासून त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत अयोध्येत राहूनच मंदिर निर्मितीचे कार्य केले. अविनाश संगमनेरकर यांच्यावर त्यावेळी विदर्भाचे प्रतिनिधित्व करण्याचीच जवाबदारी देण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा पन्नासहून अधिक अभियंते, तंत्रज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक आणि इतर साडेचार हजारांच्या जवळपास कामगार सहभागी झाले होते.


बहुतांश काळ अयोध्येतच


ट्रस्टच्या माध्यमातून खासगी कंपन्यांनादेखील कामाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, देखरेखीसाठी संगमनेरकर यांच्यासह पाच प्रमुख अभियंत्यांवर जबाबदारी होती. मंदिर निर्मितीत सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल आणि  इलेक्ट्रिकल अभियंत्यांचे काम फार मोठे होते. कामाचे महत्त्व लक्षात घेता संगमनेरकर हे साडेतीन वर्षांतील बहुतांश काळ अयोध्येतच राहिले. आज देशाच्या सन्मानाचे प्रतीक ठरणाऱ्या या मंदिराच्या निर्मितीत योगायोगाने का होईना मात्र नागपुरातील एका अभियंत्यांचे मौलिक योगदान लाभले आहे. 


कृष्णशिलेत साकारलंय श्रीरामाचं तेजस्वी रुप 


अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेली प्रभू श्रीरामाची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. शालिग्राम खडक म्हणजेच, कृष्णशिला. हा काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचं रूप मानलं गेलं आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले जातात. शालिग्राम खडक हजारो वर्ष जुना आहे. हा खडक पाणी प्रतिरोधक आहे. चंदन आणि रोळी लावल्यानं मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.   


हेही वाचा: